Nagpur Political News : पोलिस पाटील भरती प्रक्रियेत अटींना डावलून ग्रामपंचायत सदस्य व गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आली. लेखी परीक्षेत कमी गुण असलेल्यांना प्रत्यक्ष मुलाखतीत जास्त गुण देण्यात आले. या प्रक्रियेत प्रचंड घोळ झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे. (A person with a criminal record was selected)
माजी मंत्री तथा सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात उपाध्यक्षांच्या बंगल्यावर बैठक झाली. यात अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सर्व सभापती, सदस्य व कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लेकुरवाळे यांनी सांगितले की, या भरतीत घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
सर्व उमेदवारांसह परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती मागण्यात आली. आंदोलनानंतर ती देण्यात आली. यात भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येते. ग्रामपंचायत सदस्यांना नियुक्त करता येणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट होते. त्यानंतरही विहीरगाव, वाढोणा, मोरगाव आदी गावांत ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली.
नागपूर ग्रामीण तालुक्यातील येरला गावात चक्क गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची निवड झाली. लोधीपांजरा, पुसागोंदी, बोरी, बोखारा, खापातांडा, धानला, वडगाव आदी ठिकाणी निवड होणारे आधीच निश्चित होते. त्यामुळे लेखी परीक्षेत ज्यांना जास्त गुण आहेत, अशांना प्रत्यक्ष मुलाखतीत कमी गुण देण्यात आले. तर दुसऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीत जास्त गुण देण्यात आले.
एका ठिकाणी तर प्रत्यक्ष मुलाखती एकाला २० पैकी १९ गुण देण्यात आले. यामुळे त्याला सर्वाधिक गुण झाल्याने त्याची निवड दाखवण्यात आली. २६ ऑगस्टला सर्वांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तर अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आक्षेपावर सुनावणी घ्यावी. यावर निकाल दिल्यावर नियुक्ती द्यावी, असेही लेकुरवाळे म्हणाल्या. सोमवारी (ता. २८) आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडाऱ्याचे (Bhandara) जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अशा प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली होती, तशीच चौकशी नागपुरातील (Nagpur) निवडीची केली पाहिजे, असे लेकुरवाळे म्हणाल्या. पात्र उमेदवारांची नियुक्ती झाली पाहिजे. असा प्रकार योग्य नाही. त्यामुळे प्रसंगी लोकायुक्तांसह न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.