तेव्हा तुम्हालाही मुख्यमंत्रिपद देणार होतो, असे तर फडणवीसांना सांगायचे नाही ना?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता.
Devendar Fadanvis and Uddhav Thackeray
Devendar Fadanvis and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : काल, परवापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकावर एक धक्के देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करून २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असे तर फडणवीसांना आज सांगायचे नाही ना, असा प्रश्‍न जनसामान्यांसह राजकीय जाणकारांनाही पडला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विविध अंदाज वर्तविणारे धुरंधरही आजच्या घडामोडी पाहून चक्रावून गेले नसतील, तर नवलच. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता. पण थोड्यात वेळात शिंदेंना मुख्यमंत्री बनवून सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले असलेल्या फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सर्वात मोठा धक्का होता. ते काहीही असो पण बंडखोर शिंदेंना मुख्यमंत्री बनवून २०१९ मध्ये आपण उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असाच संदेश देत ठाकरेंना डिवचले असल्याचे बोलले जात आहे.

हा निर्णय घेऊन फडणवीसांनी राजकीय प्रगल्भता दाखवली असली तरी, कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या मते फडणवीसांनी शिवसेनेच्या वाघाची शिकार केली, असे मुळीच नाही. तर त्यांच्या दिल्लीत बसलेल्या शिर्षस्थ नेत्यांनी फडणवीसाची राजकीय शिकार केली आहे. आज राजकारणात प्रत्येकाला सत्तेचा लोभ सुटलेला आहे. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्याची खुर्ची सोडण्याचे औदार्य दाखविण्याची दानत कुणातही नाही. फडणविसांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा निर्णय आज राजभवनात पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्रिपदी बसावे लागणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि काहीच वेळात ती खरीही ठरली.

Devendar Fadanvis and Uddhav Thackeray
Eknath Shinde : ठाकरे, ना फडणवीस, विठ्ठलाच्या महापुजेला `एकनाथ` जाणार

सत्तेसाठी नाही, तर तत्त्वांसाठी लढायचे आहे. हे सांगण्याचा आधार फडणवीसांनी मिळवला. त्यांनी सत्ता सोडली. भाजप नेते नजीकच्या लाभापेक्षा दूरगामी लाभ आणि पक्ष मोठा करण्यासाठी कार्य करतात, हे सिद्ध केलं. न्याय देणारा मुख्यमंत्री दिल्याचे वातावरण त्यांनी तयार केले. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला, हे सर्व काही बोलले जात असताना अवघ्या काही वेळातच या चर्चेतून फुगविलेला फुगा फुटला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉलनंतर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. त्यामुळे आज मी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवले, तेव्हा तुम्हालाही मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असा संदेश फडणवीसांनी दिला, हे कुणालाही पटत नाहीये. तर सर्वकाही दिल्लीश्‍वरांच्या इशाऱ्यावरून झाले आणि या नाट्यात प्रकाशझोतात असलेल्या फडणवीसांना दुय्यम स्थान स्वीकारावे लागले, हेच खरे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com