Gadchiroli news : गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता ही थरारक घटना घडली.
घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे पत्रक टाकले असून, त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत. लालसू वेलदा (६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे.
हेडरी पोलिस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री 9 वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच हा थरार घडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी आढळलेल्या पत्रकात, सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे.
विशेष म्हणजे या हत्येच्या घटनेसाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. नक्षलवाद्यांनी ठार केलेले गाव पाटील लालसू यांचा मुलगा पोलिस दलात कार्यरत आहे.
''आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत, तर हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. लवकर सुधरा अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही,'' अशा शब्दांत खाण समर्थकांना नक्षल्यांनी पत्रकातून इशारा दिला आहे.
''एटापल्लीच्या हेडरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत. योग्य तो तपास करण्यात येईल, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक, नीलोत्पल यांनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.