Chandrapur News : सोमवारी, 22 जानेवारी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभर अयोध्या येथील कार्यक्रमाची चर्चा आहे. यासाठी आता चंद्रपुरातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने भक्तीचा महोत्सव पार पडणार आहे. आज (ता. 20) श्रीराम नामस्मरणाचा चंद्रपुरात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार असून याकरिता 'गिनीज'चे प्रतिनिधी दाखल होणार आहेत.
आज सायंकाळी होऊ घातलेल्या या उपक्रमाबाबत संपूर्ण जिल्ह्यात कमालीची उत्सुकता पसरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात तीन दिवस भक्तीचा महोत्सव चालणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘चंद्रपूरमधून अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहापासून सर्व लाकडी कामांसाठी काष्ठ पाठविण्यात आले. त्यासाठी देवानेच आपली निवड केली आहे.
डेहराडूनमध्ये जगभरातील लाकडांचे संशोधन झाले, तेव्हा आपलेच काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले. अयोध्येतील मंदिर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी लेखी पत्राद्वारे तशी पावती दिली. अशा परिस्थितीत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याची माझी इच्छा होती, मी एकटाच जाऊ शकलो असतो आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभू श्रीरामभक्त येथेच राहिले असते. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी शेकडो रामभक्तांसोबत चंद्रपूरमध्ये ‘सियावर रामचंद्र की जय’ हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला, असे मुनगंटीवार म्हणाले.
20 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राऊंडवर श्रीराम नामस्मरणाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘या कार्यक्रमासाठी ‘गिनीज’ने 200 अटी आणि नियम टाकून दिले आहेत. त्याचे भान आपल्याला ठेवायचे आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर चांदा क्लब मैदानावर शिस्तबद्ध रीतीने अंथरलेल्या हजारो पणत्यांच्या साहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ हा अकरा अक्षरी मंत्र लिहिणार आहेत. हजारो पणत्यांनी सजवलेले हे भव्यदिव्य रामनाम आकाशातून अविस्मरणीय दिसणार आहे, असेही ते म्हणाले.
21 जानेवारीला सकाळी 11 वाजता 'गिनीज'च्यावतीने प्रमाणपत्र प्रदान करण्याचा सोहळा होणार आहे. यावेळी बंगाली समाजाच्या भगिनी शंखनाद करतील. 20 जानेवारीला ‘एक्स’वर ‘सियावर रामचंद्र की जय’ हा जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा ट्रेंड राहील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री मुनगंटीवार यांनी केले. रामायणात उल्लेख असलेले जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरातून आठ गिधाडमुक्त करण्यात येणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्व समुदायांना प्रज्ज्वलित करण्याचा मान..
पहिली रामज्योत प्रज्ज्वलित करण्याचा मान वाल्मीकी समाजाचे शशी लखन सरवाम यांना मिळणार आहे. त्यानंतर दुसरी ज्योत केवट भोई समाजाच्या आशा दाते, तिसरी मुस्लिम समाजाच्यावतीने चाँद पाशा सय्यद, चौथी अनुसूचित जातीच्या प्रियंका थूल, पाचवी आदिवासी समाजाच्या गीता गेडाम, सहावी शीख समाजाच्यावतीने बलजित कौर बसरा प्रज्ज्वलित करतील. त्यानंतर सर्वांनी ज्योत प्रज्ज्वलित केल्यावर लाइट्स बंद होतील आणि नयनरम्य दृश्य तयार होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.