Nagpur News : विधानसभेचे मतदान आटोपल्यानंतर काल दिवसभर कार्यकर्त्यांनी बुथवरची आकडेवारी गोळा केली. कोणाला कुठून आणि किती मतदान मिळाले, याचे अंदाज बांधले. त्यानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. दक्षिण-पश्चिम आणि पूर्व नागपूर सोडल्यास शहरातील चार मतदारसंघात काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. अर्थात हा अंदाज असून उद्या मतमोजणीनंतर कोणाचे गणित बिघडणार, हे स्पष्ट होईल.
दक्षिण-पश्चिममध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल गुडधे रिंगणात आहेत. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे आमदार कृष्णा खोपडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दुनेश्वर पेठे यांच्यातील सामन्यात दोन बंडखोरांनी रंगत आणली आहे. दोघे कोणाची मते घेतात आणि किती विभाजन करतात यावर येथे सर्व अवलंबून आहे.
असे असले तरी पंजा चिन्ह नसल्याने महाविकास आघाडीला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. उत्तर नागपूमध्ये माजी मंत्री व काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांचे जिंकणे निश्चित आहे. असेच चित्र येथे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही उत्तर नागपूर जिंकणे अवघड असल्याचे वाटत आहे. मध्य नागपूरमध्ये सर्वाधिक चुरशीचा सामना रंगला आहे. येथून कोण निवडूण येईल याचा कोणालाच अंदाज येत नाही.
भाजपचे प्रवीण दटके, काँग्रेसचे बंटी शेळके आणि हलबा समाजाचे प्रतिनिधी रमेश पुणेकर या तिघांचेही समर्थक आमचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करीत आहे. टेबल सर्व्हे व मुस्लिम व हलबा समाजचा कौल बघता काँग्रेसला फायदा होईल असे सांगण्यात येत आहे.
दक्षिण नागपूर येथे काँग्रेसचे गिरीश पांडव आणि भाजपचे मोहन मते यांच्यात थेट लढत झाली. मागील निवडणुकीत येथे दोघांमध्ये अवघ्या चार हजार मतांचाचा फरक होता. तो भरून काढण्यात आला असल्याचा दावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे. पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या समोर विरोधकांनी सुरुवातीला मोठे आव्हान उभे केले असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
ठाकरे यांची मते नरेंद्र जिचकार आपल्याकडे वळवतील असेही दावे केले जात होते. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. हा सर्व अंदाज ऐकीव माहितीच्या आधारावर काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात मतमोजणीतून काय पुढे येते हे निकालानंतरच समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.