Maharashtra Assembly Winter Session : राज्यात दुधाच्या खरेदी दरात घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे अपेक्षित आहे. परंतु राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्रीच दुधात भेसळ असल्याचे कारण देऊन शेतकरी आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दूध दराच्या प्रश्नावर बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात सध्या ज्या दराने दुधाची खरेदी होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्चही हाती येत नाही. दुधाच्या उत्पादनासाठी लिटरला 34 ते 35 रुपयांपर्यंत खर्च येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून सध्या केवळ 25 रुपये दराने दुधाची खरेदी केली जात आहे. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी राहून दुधाला 35 रुपये दर देण्याची मागणी केली आहे.
दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, राज्यात खासगी दुध खरेदी संघटनाकंडून स्वस्तात दूध खरेदी करून त्यांची पावडर तयार करून ती परदेशात निर्यात केली जाते. त्यामुळे त्यांना चांगला दरही मिळतो. मात्र शेतकऱ्यांना केवळ 25 रुपये दूधदर मिळत आहे. तसेच राज्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळाला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे देखील सुशिक्षित तरुण या व्यवसायात उतरला आहे. त्यामुळे दूध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला आहे. तसेच दुसऱ्या राज्यातही महाराष्ट्रातून दुधाची निर्यात करू लागला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"शेतकरी आणि महाराष्ट्राची बदनामी का करताय?"
दुधाच्या दरावरून सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याच्या मुद्द्याकडे थोरात यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या अत्यल्प दराने शेतकरी आर्थिक संकटात आहे. मात्र, दुधाचे दर 25 रुपयांच्या खाली तरीही कोणतीही ठोस उपायोजना केलेली नाही अथवा दराबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. याउलट दुग्ध विकास मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या दुधात भेसळ असल्याचा आरोप केला. म्हणजे या सरकारचा राज्यातील दुग्ध व्यावसायिकाला बदनाम करण्याचे कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका त्यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.
तसेच अशा प्रकारच्या सरकारच्या आरोपामुळे ग्राहकांवर परिणाम होतो आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, परिणामी परराज्यातील दुधाची मागणी जास्त वाढते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती थोरांतीनी स्पष्ट केली. तसेच राज्यात भेसळ विरोधी कायदे आहेत, त्याचा वापर करून कारवाई करण्याऐवजी सरकार दुग्ध उत्पादक शेतकरी आणि राज्याला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोपही थोरात यांनी यावेळी सरकारवर केला.
कष्टाचा दुग्ध व्यवसाय तोट्यात
दुग्ध व्यवसयामध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागते. चारा, पशुखाद्य यासह जनावरांची काळजी घेणे, दूध काढणे, ते खरदीकेंद्रावर पोहोचवणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाला दूध दराच्या घसरणीने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजे आहे. ज्या ज्यावेळी दुग्ध व्यवसायात अडचणी निर्माण होतील, त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडून योग्य दर देऊन प्रसंगी अनुदान देऊन दुधाची खरेदी केल्याची आठवण यावेळी थोरातांनी राज्य सरकारला करून दिली.
सरकारने दुधाला योग्य दर देऊन दुग्ध उत्पादक शेककऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ निर्माण करण्याची गरज असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. यासाठी शेजारच्या राज्याप्रमाणे दुधाला अनुदान देणे, दूध पावडर निर्मितीला प्रोत्साहन देऊन दुधाचे दर 34 ते 35 रुपये कशा पद्धतीने देता येतील यासाठी शासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
अजित पवारांची भूमिका...
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दुधाला किमान किमान 35 रुपये दर मिळाला पाहिजे,अशी मागणी केल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दुग्ध मंत्री आणि विरोधीपक्षातील सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या दुधाला परवडणारा दर कशापद्धतीने देता येईल यासंरदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी सभागृहात दिले आहे.
Edited by Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.