Nagpur Assembly Session 2023 : मुंबई महापालिकेतील गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूर विधिमंडळ अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची यादीच जाहीर करत ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. चहापानावरील बहिष्कारापासूनच विरोधकांचे अवसान गळाल्याचे दिसून आले. यासोबतच जागावाटपासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने ते व्यग्र आहेत. पण दिशा सालियन प्रकरणात मोठे आरोप झाल्याने विरोधी पक्षांचे गलबत दिशाहीन झाल्याचे दिसले, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवातच ठाकरेंवर हल्लाबोल करत केली.
अधिवेशनात, रस्त्यांवर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून किती आरोप केले आमच्यावर. पण मी काहीच बोललो नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती सोडली नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पण संस्कृती सोडायला लावू नका. खूप आहे पोतडीत, ते काढायला भाग पाडू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोविडमध्ये जे काही घडले, ते मुंबईकर विसरलेले नाहीत. असे काही प्रकार घडलेत त्याने सर्वांनाच चिड येईल. कोविड काळात झालेला जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराच्या सुरस कधा या अरेबियन नाईट्स पेक्षाही अकल्पित आणि भारी आहेत. कोविडमधील घोटाळ्यांना कॅग आणि ईडीच्या तपासातून वाचा फुटली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदेही कमी पडतील, इतका प्रचंड घोटाळा मुंबई महापालिकेत कोविडमध्ये झालेला आहे. ऑक्सिजन प्लँट उभारणीतही घोटाळा झाला आहे. काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पावर ऑफ अॅटर्नी देऊन इतर कामेही त्यांनी घेतली. आदित्यराजाच्या कृपेने वरुणराजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पाडला, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
रोमिल छेडा हा या घोटाळ्यांमधील महत्त्वाचे प्यादे आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे-ब्रिज बांधणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विनसाठी पायाभूत सुविधा बनवण्याचे कंत्राट मुंबई महापालिकेने दिले. या कंपनीने पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे हे काम रोमिल छेडाला दिले. त्यानंतर पुढील चार वर्षांत 270 कोटी रुपयांची तब्बल 57 कंत्राटे देण्यात आली. कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे कंत्राटही या कंपनीला देण्यात आले. रस्ते बांधणारी कंपनी पण, मिळाले पेंग्विनचे काम, कोविडचे काम दिले गेले. कशासाठी दिले? विशेष म्हणजे या रोमिल छेडाचे बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचे कपड्यांचे दुकाने होते. हे सर्व तपासात समोर आले आहे. कंत्राटाचे 2 टक्के वगळता उर्वरित सर्व पैसे रोमिल छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला गेला. एकीकडे माणसे मरतायेत, लोकांचे जीव जातायेत, याचा तरी विचार करायला हवा होता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केला.
ऑक्सिजन प्लँटचे 60 कोटींचे काम जुलै महिन्यात पूर्ण करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण झाले. मात्र, सदर काम ऑगस्टमध्ये म्हणजे एक महिना उशिराने पूर्ण झाल्याचे दाखवून त्यासाठी फक्त 3 कोटी रुपयांचा दंड आकरण्यात आला. त्यातही गैरप्रकार झाला तोही तपासात आला. तीन महिने उशिराने काम पूर्ण केल्याने 9 कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होते. 3 कोटीचा दंड आकारला. पण हे प्रकरण इथेच संपत नाही. बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे दाखवले. याच दाखल्याच्या आधारावर लगेच पुढचे 80 कोटींचे काम त्याला देण्यात आले. रोमिल छेडाला पेंग्विन एक्झिबिशनबरोबरच रोबोटीक झु, फाय डी थिएटर, प्रशासकीय कार्यालये, लांडगे, कोल्हे, कासव, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्षांचे पिंजरे, रेप्टाइल हाऊस यांची कामे रर्रास देण्यात आली. पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे कंत्राटही देण्यात आले. पेंग्विन करता डॉक्टर आणि मासे पुरवण्याचे कंत्राटही देण्यात आले. एक-एक महिन्यात कामे पूर्ण केल्याचे दाखवून कंत्राटे दिली गेली. याच कंपनीला महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे कामही देण्यात आले. झु हॉस्पिटलमध्ये हाऊस किपिंगचेही काम दिले गेले, असे सांगत मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरेंवर हल्लाबोल केला.
ही कंपनी काय-काय करते याची मोठी जंत्रीच आहे. आणखी खूप काही आहे. हे ऐकून सर्वांचे डोके गरगरायला लागेल. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला वेगवेगळी कामे देऊन हे लोक कुठल्या थराला गेलेत, हे समोर आले आहे. एवढ्या डिटेलमध्ये मी कधीच बोललो नव्हतो. पण तुम्ही रोज आरोप करणार, रोज शिव्या घालणार, रोज आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार. पण आता तपासातून सगळे बाहेर येईल. ऑक्सिजन प्लँटमध्ये गंजलेले साहित्य वापरल्याने लोकांचे डोळे गेले. यांना लोकांशी काही देणे-घेणे नाही. फक्त पैशांशी मतलब आहे. जिथे टेंडर, तिथे सरेंडर. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी आणि जनतेने फिरावे दारोदारी, अशा वृत्तीने काम करणारी माणसे मुंबईचा आणि महाराष्ट्राचा कसा विकास करतील?, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. इथून पुढे आरोप करताना विचार करून करा. नाहीतर यापेक्षाही जास्त प्रकरणं माझ्या पोतडीत आहेत, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.