Amravati News: शिक्षकांना शैक्षणिक कामकाजापासून दूर ठेवून राजकीय प्रचारासाठी वापरले जात असल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर टीका केली आहे.
शिक्षकांना प्रचाराच्या कामाला जुंपले जात असेल, तर संबंधित संस्थेची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करून मान्यता रद्द करण्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. या प्रकरणाची दखल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचेही त्यांनी सूचित केले.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कारभारावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. संस्थेचा नामोल्लेख करत टीका करण्यात आली नसली, तरी बावनकुळे आणि बोंडे यांच्या वक्तव्यांचा रोख याच संस्थेकडे असल्याचे स्पष्ट झाले.
शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, शाळांना सुट्टी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल आणि शिक्षकांना राजकीय प्रचारात सहभागी करून घेतले जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
शिक्षकांचा वापर राजकीय कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी गंभीर असून, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. संबंधित संस्थेच्या कामकाजाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा इशारा देतानाच, गरज पडल्यास संस्थेची मान्यता रद्द करण्याबाबतही कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष चौकशी समिती गठित करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या कारभारावरून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाचा काँग्रेसकडून किती गैरफायदा घेतला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकांना सक्तीने थांबवून ठेवण्याऐवजी त्यांना प्रचाराच्या कामासाठी वापरले जात असल्याचा आरोप बोंडे यांनी केला. शिक्षकांना प्रचारात सहभागी करून घेतल्यामुळे महाविद्यालये ओस पडल्याचेही त्यांनी म्हटले.
शिक्षकांना कोणी वेठीस धरत असेल, तर ते सहन करू नये, अशी भूमिका मांडत बोंडे यांनी काँग्रेसवर शिक्षकांचा छळ केल्याची टीका केली. दरम्यान, शिक्षण संस्थेच्या कामकाजावरून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मात्र, या आरोपांवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेची भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.