Yavatmal Maratha Aarakshan Andolan : मराठा समाजाच्या जालन्यातील आंदोलनाची धग राज्यभर पोहोचली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचे लोक आक्रमक होत आहेत. विदर्भातील यवतमाळमध्येही लोक आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले. (The District Superintendent of Police had to take to the streets)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ शहर कडकडीत बंद केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वळवला. वनवासी मारोतीजवळ टायर जाळून नागपूर-तुळजापूर महामार्ग बंद केला. तब्बल दोन तास हा महामार्ग बंद आंदोलकांनी बंद केला होता. दरम्यान सरकारचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी आंदोलकांनी जाळला.
आंदोलकांमधील कुणीतरी एका प्रतिष्ठानावर गोटा मारला. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. महामार्गावर टायर जाळण्याच्या कारणावरून आंदोलनकर्ते आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड रस्त्यावर उतरले आहेत. लाठीचार्ज संदर्भात आदेश देणाऱ्यासह सरकारचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.
दिलेल्या आदेशाचे पोलिसांनी (Police) फक्त पालन केले. त्यामुळे जालना (Jalna) पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले, त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का, असा प्रश्नही आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) पेटून उठला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून कुठेही आंदोलन केले, तरी पोलिसांना आता संयमाची भूमिका घ्यावी लागत आहे. पुन्हा एखादा लाठीचार्ज झाल्यास भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जालन्यात मराठी बांधवांवर लाठीहल्ला झाला, हे आम्हाला माहिती आहे. कोणी केला, तर पोलिस दलाचे लोक लाठीहल्ला करत आहेत, हे दिसते. त्याच्या खोलात जाणं, हे सरकारचं काम आहे. कोणी सूचना दिल्या, का दिल्या, त्या देण्याची गरज होती का, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण सरकारने दिलं पाहिजे. अधिकार त्यांच्या हातात आहेत, आमच्या कोणाच्याही हातात नाही, असे शरद पवार यांनी आज जळगावच्या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसह कॉंग्रेसचे नेतेही लाठीचार्जनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तुटून पडले आहेत. सर्व स्तरांतून सरकारच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकार हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.