Maratha Reservation : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने विशेष अधिवेशनात घेऊन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी या दोन्ही समजांना खूष ठेवण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटील या निर्णयावर नाखूष असले तरी ओबीसी नेते मात्र समाधानी आहेत.
जरांगे पाटील वारंवार उपोषण करीत असल्याने राज्य शासनाला विशेष अधिवेशन बोलवावे लागले. जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसींवर अन्याय होईल, अशी भीती ओबीसी नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. सरकारने ओबीसींवर अन्याय करणार नाही, असा शब्द दिला होता. दुसरीकडे जरांगे पाटील यांची ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, या आपल्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. सरकारने विशेष अधिवेशनात घेतलेल्या निर्णयात ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही. मात्र, जरांगेंचे मन ठेवण्यात सरकारला अपयश आल्याचे दिसते.
ओबीसींना दिलेला शब्द पाळला...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची ग्वाही राज्य शासनाने दिली होती. सरकारने तो शब्द पाळला. सोबत मराठा समाजालाही आरक्षण दिले. ही आनंदाची बाब आहे. संविधानाच्या कक्षेत बसत नाही ते सरकार मान्य करू शकत नाही. जरांगे पाटील यांनी याचा विचार करावा. राज्य सरकरावर विश्वास ठेवावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठ्यांना महायुतीने न्याय दिला...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय अंत्योदयाला न्याय मिळवून देणारा आहे. गेली काही वर्षे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची आग्रही मागणी सरकारने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे, मात्र ते देताना सरकारने ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर अन्याय करू नये, ही आमची मागणी होती. त्या मागणीचा सन्मान सरकारने ठेवला असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मराठा आरक्षणाला मूर्त स्वरूप...
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता महायुती सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मराठा समाज बांधवांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मागणीला या विधेयकाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले. महायुती सरकार सर्वच घटकांना न्याय देते, कुणावरही अन्याय करीत नाही, असे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख म्हणाले.
मराठा समाजाची घोर फसवणूक...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा घाईघाईत घेण्यात आला. हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही, हे सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना काय शब्द दिला होता, ते जनतेसमोर स्पष्ट करावे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाचे मागासेलपण सिद्ध केले आहे, असा सरकारचा दावा आहे. सहा दिवसांत मुंबई शहरातच २६ लाख लोकांचा स र्व्हे केला, हे आश्चर्यकारक आहे, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.