
Nagpur News : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत खणखणीत यश मिळाले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना महत्त्वाचे महसूल खाते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे आता भाजप नवा प्रदेशाध्यक्ष निवडणार असल्याची चर्चा आहे.
मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा भाजपची सदस्यता मोहीम आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "दीड कोटी सदस्य संख्या असलेला आमचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनता भाजपचा सदस्यत्व घेण्यासाठी आमच्याकडे येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता आम्हीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी पूर्णपणे झोकून देणार आहोत".
आगामी महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) विजय मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे. जनताही आमच्यासोबत आहेत. त्यांना भाजपसोबत जोडून ठेवण्यासाठी सदस्य अभियान राबवले जात आहे. हे अभियान आटोपल्यानंतर आम्ही पुढच्या प्रक्रियेला लागणार आहोत. यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती या प्रक्रियेचाही समावेश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
'आम्ही जनतेतून निवडून आलो असल्याने आम्ही जनसेवक आहोत. जनसेवकांनी जनतेसमोर नतमस्तक होऊनच आपला कारभार केला पाहिजे. मतदार हा आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्ही कोणीही राजे नाही, तर सेवक आहोत आणि सेवकाच्या भूमिकेतच आम्ही राहणार आहोत', असे सांगून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना मंत्री बावनकुळे यांनी टोला लागावला.
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्यासाठी दोन कोटी रुपये दिले होते. वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भात काय करायचे यावर केंद्र सरकार विचार करत आहे. लोकसभेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र हिंदू समाजाच्या वक्फ बोर्डाने चुकीच्या पद्धतीने जप्त केलेल्या मालमत्ता परत केल्या पाहिजे. याकरिता मंत्री नीतेश राणे जे बोलले ते योग्यच असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.