नागपूर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना चांदुर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने (Court) २ महिने कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथ पत्रात बच्चू कडू यांनी मुंबई (Mumbai) येथील फ्लॅटची माहिती दडवली होती. ही माहिती निवडणूक आयोगापासून दडवणे राज्यमंत्री कडूंना चांगलेच महागात पडले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारात सदर माहिती मिळवून २०१७ मध्ये कडूंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा फ्लॅट बच्चू कडू यांच्या मालकीचा आहे. असे असतानासुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला ही माहिती दिली नाही. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासात मुंबईतील ४२ लाखांचा फ्लॅट बच्चू कडू यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर न्यायालयाने उपरोक्त शिक्षा ठोठावली.
२०१७ मध्ये तक्रार झाल्यानंतर बच्चू कडूंनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरे उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी बॅंकेकडून ४० लाख रुपयांचे कर्जदेखील देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड वेळेत होऊ न शकल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना मुंबईतील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला दिली नव्हती. नेमकी हीच बाब हेरून तक्रारकर्त्याने बच्चू कडू यांनी माहिती दडवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू होती. चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने आज अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.