Amravati Political News : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं खऱ्या अर्थानं कुणी भलं केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलंय. पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी एका पत्रावर ५२ जातींना ओबीसी प्रवर्गामध्ये घेतलं. त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षणात घेतलं असतं, तर आज जो आरक्षणासाठी लढा सुरू आहे, तो पेचच निर्माण झाला नसता, असा दावा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केला. अमरावती येथे शुक्रवारी (ता. १०) त्यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली.
आमदार कडू म्हणाले, पवारांनी मराठ्यांना आरक्षणात घेतलं नाही. त्यांनी फक्त ओबीसी समाजाचं हित जोपासलं. त्यामुळं आमचा तोच राग आहे की पवार साहेबांनी मराठ्यांना घ्यायला काय अडचण होती? पवारांनी त्यावेळी उदारता दाखवली असती तर आज मराठा समाज कुठेच्या कुठे निघून गेला असता, असा घणाघातही त्यांनी केला. (MLA Bacchu Kadu angry on NCP Leader Sharad Pawar at Amravati for not taking Maratha in OBC Reservation in Maharashtra while he was CM)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचं सरकार तोडगा काढत आहे. आता तरी मराठा समाजाला न्याय मिळेल असं चित्र दिसतेय. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा आरक्षण कसं वाढेल हा विचार केला पाहिजे. आरक्षणाचा वणवा सर्वत्र पेटलाय.
त्यात सर्व जण आपली केटली गरम करताहेत. काही राजकीय मंडळी यातून मोठा फायदा करून घेतील. मात्र, त्यातून मराठा समाजाला काहीच मिळणार नाही, असंही आमदार कडु म्हणाले.
मराठा हा कुणबी नाही तर कोण आहे, हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगावं. विदर्भ वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील मराठा कुणबी असलेला चालतो. मग या ११ जिल्ह्यांतील मराठ्यांबाबत अनेकांना वावडं का आहे हे कळत नाही. विदर्भातील मराठा कुणबी नाही का, असं असेल तर मराठवाडामधील व विदर्भातील मराठा-कुणबी यांत भेद का केला जातोय, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षणासाठी आतापर्यंत राज्यात ५० मराठ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेकांनी ओबीसी समाजाचं कैवारी व्हायचय. त्यांनी ते व्हावं. परंतु त्यासाठी मराठा समाजावर अन्याय करू नका. काही लोक आरोप करताहेत, की कुणबी संदर्भात बोगस नोंदी होत आहेत. परंतु यापैकी अनेक नोंदी हस्तलिखित आहेत.
त्या बऱ्याच जुन्या आहेत. या नोंदींच्या आधारावर संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. तो त्यांचा हक्क आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आम्हाला शिंदे हेच मुख्यमंत्री हवे होते. आजही हवे आहेत. शिंदे मुख्यमंत्री राहणार नसतील तर आम्हीही काय करायचं याचा विचार करू.
ही बाब सूर्य प्रकाशप्रमाणं स्पष्ट आहे. त्यात लपवायसारखं काहीच नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या जागेवर दुसरा कुणी मुख्यमंत्री होणार असेल तर अयोग्य आहे. आपल्या मते मुख्यमंत्री बदलणार नाही. बदलण्याचं काही कारणही नाही, तशी वेळही कधी येणार नाही, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी या वेळी केला.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.