Free Electricity : देशातील अनेक राज्यात घरगुती वापराची वीज मोफत दिली जात आहे. अशात विद्युत निर्मितीची माहेरघर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट वीज मोफत मिळावी, याकरिता विदर्भातील आमदार किशोर जोरगेवार यांचा एकाकी लढा सुरू आहे.
चंद्रपूरातून निघालेल्या 200 युनिट मोफत विजेचा आवाज आता त्यांनी राज्यभरात पोहचविला आहे. देशात पहिल्यांदा ही मागणी करणारा चंद्रपूर जिल्हा ठरला आहे. 2017 ते 2018 मध्ये 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी चंद्रपुरातून उठली होती. त्याचे कारण ठरले चंद्रपुरातील कोळश्यावर आधारित औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र.
चंद्रपुरातील या केंद्रात औष्णिक विजनिर्मित केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठला आहे. त्याचे दुष्परिणाम येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात मोहिम राबवित येथील नागरिकांना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी, यासाठी लढा उभारला. या मागणीसाठी त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. या मागणीसाठी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते.
2019 मधील निवडणुकीत किशोर जोरगेवार अपक्ष म्हणून 71 हजाराहून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत भाजप वगळता सर्व उमेदवारांची जमानती जप्त झाली. प्रचंड मोठी लाट असतानाही अपक्ष आमदार म्हणून जोरगेवार देशाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल. त्यानंतर मुंबई झालेल्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी चंद्रपुरकरांना 200 युनिट वीज मोफत देण्याचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात ते ही मागणी रेटून आहेत. याचा परिणाम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर दिसू लागला होता. तेव्हाचे ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखवत राज्याला 100 युनिट वीज मोफत देण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशात लगेचच कोरोनाचे संकट राज्यावर कोसळले आणि अर्थव्यवस्था डबघाईस आली. या संकटाशी लढताना पुन्हा एकदा वीज मोफत देण्याचा विषय थंड बस्त्यात पडला. कोरोनाच्या संकटातून राज्य सावरला. पूर्वीप्रमाणे जनजीवन रुळावर आले. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली झाली. मात्र याच दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी नव्याने स्थापित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत जोरगेवार यांनी पुन्हा मोफत विजेच्या मागणीसाठी नव्याने पाठपुरावा सुरू केला.
विद्यमान सरकारवर मात्र याचा परिणाम होताना दिसत नसल्याने मागील वर्षी झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आमदार जोरगेवार यांनी सत्तेत राहून सत्तेविरोधात आंदोलन केले. जोरगेवार यांनी स्वतः मोटारसायकल चालवत तीन हजार मोटारसायकलचा मोर्चा काढला. चंद्रपूर ते नागपूर हिवाळी अधिवेशन असा हा दुचाकी मोर्चा होता. या मोर्चाने पुन्हा एकदा राज्याचे व राज्य सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधले. नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
राज्याला वीज देऊन आम्ही पाप करतोय का, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या त्यांनी राज्यातील सर्व वीज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी ही मागणी रेटून धरली आहे. आता त्यांच्या या लढ्यात वीज उत्पादक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा आणि नागरिकांचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे. विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती होते. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाने विदर्भीय जनतेचा श्वास गुदमरत आहे. संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या या जिल्ह्यांची बत्ती मात्र नेहमीच गुल असते.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.