Gram Panchayat : मार्च महिन्यात थकीत वीजबिल वसूल करण्यासाठी नोटीस बजावूनही प्रतिसाद न दिल्याने वीज वितरण कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या गावांतील रस्ते अंधारात बुडाले आहेत. सत्ता पक्षाचे आमदार राजू कारेमोरे प्रशासनाकडून काही तोडगा काढतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुमसर, मोहाडी तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीद्वारे थकबाकी वसुलीचे कार्य जोमाने सुरू आहे. कुठे सक्तीने वसुली तर कुठे शासनाच्या आश्वासनाकडे बोट दाखवून परिस्थिती सांभाळली जात आहे. सिहोरा परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करून संपूर्ण गावेच्यागावे रात्रीच्या काळोखात बुडाल्याचे चित्र आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक तर दुसरीकडे मतदारांची पथविद्यांची मूलभूत सुविधा खंडित करून वीज वितरण कंपनी नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा मतदारसंघ अंधारला असून ग्रामपंचायतींना वीज पुरवठा विभाग ‘टार्गेट’ करीत असल्याचे दिसून येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुमसर तालुक्यात 97 ग्रामपंचायतींमधील बहुतांश सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांची देयके भरलेली नाहीत. त्यात मधल्या काळात राज्यातील सत्तारूढ पक्षाने वीजबिलांचे देयक सरकार भरणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी सुटकेचा श्वास घेतला होता. परंतु बिलाचे थकीत गृहीत धरून मागील काही दिवसांपासून वीज वितरण विभागाने सरसकट पथदिव्यांची वीज खंडित करण्याचे सत्र चालविले आहे. त्यामुळे अनेक गावात अंधार पसरला असून वीज वितरणवर जनतेचा रोष आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने अंधारलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा मानला जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत अंधारामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद पडल्याने लोकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल अद्याप जनप्रतिनिधी मौन साधून असल्याची खंत अंधारलेल्या गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीच्या धोरणाविरुद्ध तालुक्यातील सरपंच संघटना दंड थोपटणार असल्याची माहिती आहे. गावाच्या हद्दीत उभे असणारे विजेचे खांब ग्रामपंचायतीच्या जागेतून गेले आहेत. त्यामुळे उजेड नाही तर खांबही नाही, अशी कठोर भूमिका ग्रामपंचायत संघटना घेणार आहे. प्रति खांबासाठी महावितरण कंपनीने भाडे द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेण्याची संघटनेची तयारी आहे. त्यामुळे याबाबतीत आता काय तोडगा निघतो. आमदार राजू कारमोरे याबाबतीत कसा पुढाकार घेतात?हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.