Raju Dengare Case : भाजपचे नागपूर जिल्हा पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजू डेंगरे यांच्या हत्येप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन जणांना अटक केलीय. मजुरीचे पैसे न मिळाल्यानं आपणच राजू यांची हत्या केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या दोघांनी पोलिसांना दिलीय. विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) ही अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करायचे. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचे होते. त्यासाठी त्यांची राजू डेंगरे यांच्याशी बोलणी सुरू होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Nagpur BJP Leader Raju Dengare Murder Case Solved By Police Arrests Two From Madhya Pradesh)
दिवाळीनिमित्त गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडं पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडुन प्रत्येकी सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये घ्यायचे होते. मात्र राजू ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होत. दोनदा त्यांच्यात पैशांवरून वादही झाला. त्यानंतरही राजू पैसे देत नसल्यानं दोघेही चिडले होते. दिवाळी जवळ आल्यानंतर विशेषकुमार आणि आदी यांनी पुन्हा राजू यांना पैसे मागितले. मात्र त्यांनी रक्कम दिली नाही. विशेषकुमारला त्यांनी पैसे नाकारले. त्यामुळं तो अधिकच संतापला.
रविवारी (ता. १२) रात्री अडीच वाजताच्या सुमारास विशेषकुमारनं आदीच्या मदतीने राजू यांचा कपड्यानं गळा आवळला. त्यानंतर चाकुनं वार करीत राजू यांची हत्या केली. राजू यांच्या अंगावर ब्लँकेट टाकत दोघेही कार घेऊन फरार झाले. सोमवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तपास स्वत:च्या हाती घेत पथकांना कामाला लावले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहाय्यक निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिष ठाकूर, उपनिरीक्षक बट्टूलाल, हेडकॉन्स्टेबल अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयूर ढेकले, मृणाल राऊत यांनी सायबर सेलच्या मदतीनं तपास सुरू केला. पोलिसांनी खबऱ्यालाही कामाला लावलं. एका खबऱ्यानं नियमितपणे ढाब्यावर जेवायला येणाऱ्या व विशेषकुमारच्या मित्राबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेही त्यानं विशेषकुमारचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. त्याआधारे पोलिस मंडला येथे पोहोचले. पोलिसांनी विशेषकुमार आणि आदी या दोघांना अटक करून नागपुरात आणले. मारेकऱ्यांना कुही पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.