

Nagpur News : भाजपचे हिंगणा मतदार संघाचे आमदार समीर मेघे यांच्या मालकीच्या शाळेतील केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
या केंद्रावर अवैध मतदान होत असल्याची शंका व्यक्त करून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका तथ्यहीन असल्याचे सांगून फोटाळली. यामुळे आमदार मेघे यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न फसला आहे.
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी येथील वायसीसीई कॅम्पसमधील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे एकूण सात मतदान केंद्र आहेत. या शिक्षण संस्थेचे सचिव भाजपचे हिंगण्याचे आमदार समीर मेघे आहेत. त्यामुळे हे केंद्र रद्द करण्यात यावे, आशी मागणी माजी आमदार विजय घोडमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. सोबतच न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, हिंगणा-वानाडोंगरी येथील शिक्षण संस्थेतील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे निवडणूक आयोगातर्फे मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात येतात. ही शाळा मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे संचालित केली जाते. ही शाळा हिंगणा मतदार संघात येत असून याच मतदार संघाचे भाजपचे (BJP) आमदार समीर मेघे या शिक्षण संस्थेचे सचिव आहे.
तर, या शाळेमध्ये मतदान केंद्र क्रमांक 260, 261, 262, 263, 264, 265 आणि 266 असे सात-सात मतदान केंद्र आहेत. यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्या विरोधात माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी व मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
परंतु, त्यावर सकारात्मक निर्णय न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यामध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, केंद्रीय निवडणूक आयोग, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व मतदान नोंदणी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका तथ्यहीन असल्याचे निरीक्षण नोंदवीत फेटाळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.