Nagpur Flood Update : पूर नागपुरात अन् ३०० कोटी वाहून गेले भंडाराकरांचे !

Bhandara : फटका भंडारा जिल्ह्यालासुद्धा बसला आहे.
Nagpur Flood
Nagpur FloodSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Flood News : भंडारा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नागपुरात शुक्रवारी (ता. २२) ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि नागपूरकरांना पुराचा सामना करावा लागला. आलेल्या पुराने नागपूर शहरातील तब्बल एक हजार घरांचे नुकसान झाले असून, कोट्यवधी रुपयांची संपत्ती क्षतिग्रस्त झाली आहे. (Bhandara district has also been affected)

आता राज्याची उपराजधानी म्हटल्यावर नागपूरला आलेल्या पुराचा फटका केवळ नागपूरकरांनी सोसला नसून याचा फटका भंडारा जिल्ह्यालासुद्धा बसला आहे. अनेक गोष्टींसाठी नागपूरवर अवलंबून असलेल्या भंडाराकरांना तब्बल ३०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता.

केवळ चार तासांत तब्बल १०९ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव, नाग नदी आणि इतर नाले ‘ओव्हरफ्लो’ झाले आणि त्याचे पाणी शहरातील बऱ्याच भागात घुसले. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अंबाझरी, डागा लेआऊट, शंकरनगर या भागातील पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सैन्याच्या तुकड्या, केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं.

या जवानांच्या मदतीने जवळपास ४०० नागरिकांना ‘रेस्क्यू’ करण्यात आलं. या पुरात दुर्दैवाने वेगवेगळ्या ठिकाणी तीन महिलांचा मृत्यू झाला, तर १४ जनावरे वाहून गेली. घराचं, दुकानांचं, वाहनांचं नुकसान झालं असून, राज्य सरकार नुकसान झालेल्या नागरिकांना १० हजार रुपयांची मदत करणार आहे. शनिवारी (ता. २३) सकाळपासून पाऊस थांबल्याने दुपारी पूर ओसरला आणि जनजीवन सामान्य झालं.

काल या सर्व पूरग्रस्त भागातील परिस्थिती सामान्य झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी केली. आता लवकरच नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा केली जात आहे. आता खरा मुद्दा असा की भंडारा जिल्हा हा अनेक बाबींसाठी नागपूरवर अवलंबून आहे. त्यात प्रामुख्याने मेडिकल, किराणा माल, इलेट्रॉनिक वस्तू अशा अनेक न मोजता येणाऱ्या वस्तू आहेत.

नागपूर पुराने दोन दिवस बंद होते आणि स्थिती पूर्व पदावर येण्यासाठी तिसरा दिवस उजाडावा लागला. आता तीन दिवस नागपूर बंद झाल्याने त्याचा फटका साहजिकच भंडारा जिल्ह्याला बसणारच. तब्बल या तीन दिवसांत भंडारा जिल्ह्याला तब्बल ३०० कोटी रुपयांचा फटका बसला. भंडारा शहरातील सर्वात मोठे भाजीपाला मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीटीबी मार्केटला मोठा फटका बसला.

Nagpur Flood
Nana Patole On Nagpur : नाना पटोलेंचा फडणवीस अन् गडकरींवर हल्लाबोल; म्हणाले, 'नागपूरची अवस्था भाजपच्या भ्रष्ट...'

दररोज दीड कोटी रुपयांची मिरची आणि कारले नागपुरात जातात. म्हणजे या तीन दिवसांत साडेचार कोटी रुपयांचा फटका एकट्या बीटीबी या भाजीपाला मार्केटला बसला. दुसरा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसला. पुरामुळे नागपुरात प्रवेश न मिळाल्याने तब्बल दीडशे कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला, तर जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यवसाय म्हणून राज्यभर ओळखला जाणाऱ्या वाळू व्यवसायालाही या तीन दिवसांत शंभर कोटींचे नुकसान झाले.

दुसरीकडे दोन्ही शहरांना जोडणारी लाइफलाइन म्हणजेच एसटी बसला नागपूरच्या पुराचा फटका बसला आहे. भंडारा एसटी विभागाच्या चार बसेस मोरभवन येथे आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने ८० लाख रुपयांची संपत्ती आणि दररोज मिळणारे भंडारा-नागपूर मार्गाचे पाच लाख रुपये याप्रमाणे १५ लाख रुपयांचे उत्पन्न असे ९५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मेडिकल, किराणा आणि इलेट्रॉनिक वस्तू सर्वांचा विचार केल्यास हा नुकसानाचा आकडा ३०० कोटींवर पोहोचला आहे.

Edited By : Atul Mehere

Nagpur Flood
Devendra Fadnavis Nagpur Flood : नागपूर पूरग्रस्त भागाची फडणवीसांची पाहणी; नागरिकांनी व्यक्त केला रोष !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com