
Nagpur News : नागपूर महापालिकेत महायुती कायम राहील याची शाश्वती सध्या कोणालाच नाही. त्यातही भाजप नेत्यांच्या वक्तव्याने यात आणखीच भर पडत आहे. एकही नगरसेवक नसताना 40 जागांवर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपले पांघरून बघून पाय पसरावे असा टोला भाजपचे (BJP) आमदार संदीप जोशी यांनी लगावला होता.
यावर आमचे पांघरून आणि पाय किती हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना आहे, तुम्ही ठरवणारे कोण? असे प्रत्त्युतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिले. महापालिकेच्या सर्व प्रभागात लढण्यासाठी आमच्याकडे 151 उमेदवार आहेत. ते हरले तरी आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही उलट नुकसान भाजपचेच आहे असाही इशारा त्यांनी दिला.
भाजपकडे मोठी यंत्रणा आहे. कार्यकत्यांची फळी आहे. निवडणुकीसाठी लागणारा खर्च करण्याची तयारीसुद्धा आहे. हे आम्हाला सर्व मान्य आहे. आमचा एकही नगरसेवक शहरात नाही, या उलट भाजपकडे तब्बल 108 माजी नगरसेवक आहेत, असे असताना भाजपमध्ये 50 टक्के माजी नगरसेवकांना बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.
याचे कारण अनेक नगरसेवकांची पाच वर्षे कामच केले नाही. घराच्या बाहेर पडले नाही. निवडून आल्यानंतर ते प्रभागत फिरकले नाहीत. ही आमची तक्रार नाही तर त्यांच्याच प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
भाजपच्या नेत्यांनाही हे चांगलेच ठावूक आहे. पुन्हा त्याच नगरसेवकांना तिकीट दिले तर पराभव अटळ आहे हेसुद्धा नेत्यांना कळून चुकले आहे. निष्क्रिय नगरसेवकांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी मागणी भाजपचेच कार्यकर्ते करीत आहेत याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आमची गरज होती. सर्वच नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांना प्रचारात घेऊन फिरत होते. आम्हीसुद्धा प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. शक्य तेवढी मदत केली.
निवडणुकीच्यावेळी भाजपच्या एकाही नेत्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतला नाही. तक्रारही केली नाही. यावरून आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले हे स्पष्ट होते. नागपूर शहरात आम्हालाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व राखायचे आहे. भाजपने जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत.
राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी महायुतीत आहे. यामुळे आमचे प्राधान्य महायुतीला आहे. ती झाल्यास आनंदच आहे. मात्र, फुटकळ जागा देऊन बोळवण केली जाणार असेल ती आम्ही मान्य करणार नाही.
महायुती आणि जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर बोलत नाही. भाजपच्या नेत्यांनीही यावर न बोललेच बरे असा सल्लाही प्रशांत पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा घरोघरी संपर्क सुरू आहे. बैठका घेतल्या जात आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रत्येक प्रभागत कुठे जास्त, कुठे कमी आमची ताकद आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारावर आमचा पक्ष चालत आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जनता पसंत करीत आहे असाही दावा प्रशांत पवार यांचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.