
Nagpur News : भाजप आमदारांच्या रडारवर असलेले आणि सहकार विभागातील सेवानिवृत्त सहनिबंधक राजेश भुसारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. या प्रवेशावरून महायुतीमध्ये मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे.
विशेष नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. या कालावधित बाजार समितीचे सचिव म्हणून भुसारी कार्यरत होते. पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधीच रुपयांचा घोटाळा उघड केला होता. या घोटाळा झाला तेव्हा राजेश भुसारी येथे सचिव म्हणून कार्यरत होते.
घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने 2017 मध्ये ए.डी.पाटील यांची चौकशी समिती स्थापन केली होती. पाच अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतरही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. नंतर पुन्हा एक सदस्यीय खंडागळे समिती स्थापन करण्यात आली. या समितीनेसुद्धा जवळपास 40 कोटी रुपयांचा महसूल 51 दलाल, तत्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी संयुक्तपणे बुडवल्याचा अहवाल सादर केला होता.
या भ्रष्टाचारात माजी सचिव व विभागीय सहनिबंधक राजेश भुसारी यांनी मोठी भूमिका बजावली असून त्यांच्यावर काँग्रेसच्या एक बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोप आमदार खोपडे यांनी केला होता. त्यानंतर पणन मंत्री रावल यांनी एसआयटी समिती स्थापन केल्याचा आदेश काढला.
नागपूरचे जिल्हाधिकारी यांना तपास समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक सदस्य म्हणून तर औरंगाबदचे सहकार उपनिबंधक यांची सचिव म्हणून या समितीत नियुक्ती केली आहे. या समितीला 30 दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.
कारवाई पासून संरक्षण मिळावे याकरिता राजेश भुसारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याची चर्चा आहे. सहकारी मंत्री रावल यांनी राजेश भुसारी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. गरज भासल्यास त्यांची पेंशन रोखण्यात येईल अशी घोषणा विधान सभेत केली आहे.
अजित पवार बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा एक नियोजित कार्यक्रम आहे. येथील काही बडे व्यावसायिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सायंकाळी पाच वाजता ते परत नागपूरला येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय कार्यालयात राजेश भुसारी यांच्यासह इतर लोकांचा प्रवेश समारंभ आयोजित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.