Nagpur Political News : उपराजधानी नागपुरात आंदोलन करीत असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारला आता रविवारपर्यंतची (ता. २४) मुदत दिली आहे. समाजाच्या मागण्यांवर विचार न झाल्यास सोमवारपासून (ता. २५) बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis visited the protest site and made many promises)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, यांसह एकूण १५ मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट देत एकापाठोपाठ अनेक आश्वासने दिली. ओबीसी समाजाची मनधरणी करीत हे आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर व नागपूर अशा दोन ठिकाणी फडणवीसांनी आंदोलकांची भेट घेतली. परंतु त्यानंतरही आंदोलनाची धग कायम आहे. राज्यभरातील ओबीसी समाज आता एकवटला आहे. आंदोलन अधिक तीव्र होत आहे. सरकारला आम्ही रविवारपर्यंतची मुदत देऊ शकतो. त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. आमच्या मागण्या मान्य कराव्यात. प्रश्न मिटले, समस्या सुटल्या की आंदोलनाची गरजच भासणार नाही’, असे आज ‘सरकारनामा’शी बोलताना डॉ. तायवाडे म्हणाले.
चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अशात नागपुरात आमरण उपोषण सुरू झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजबांधव सहभागी होतील. किती लोक आमरण उपोषणाला बसतील, हे सांगता येणार नाही, असे म्हणत डॉ. बबनराव तायवाडे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. ‘सरकारने आम्हाला सात दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्यांना वेळ दिला आहे.
अद्यापपर्यंत सरकारकडून चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. किती काळ प्रतीक्षा करायची, यालाही मर्यादा आहेत’, असे डॉ. तायवाडे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातील शिष्टाईनंतर ओबीसी समाज आंदोलन मागे घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु तसे झाले नाही. आंदोलन कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली व दुसऱ्याच दिवशी संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
ओबीसी समाजाच्या या आंदोलनात सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पक्षांतील नेते, आमदार, माजी आमदार मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. दिवसेंदिवस या आंदोलनाला समाजातून पाठिंबा वाढत आहे. नागपुरातील या आंदोलनाचे पडसाद अन्य जिल्ह्यांत उमटू नयेत व तेथेही ओबीसी समाज रस्त्यावर येऊ नये, यासाठी सरकार व प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.