Butibori MIDC News : कोकणातील बारसू येथे पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारण्यावरून चांगलाच वादंग झाला. समर्थक आणि विरोधक, असा मोठा संघर्ष तेथे झाला. स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला. पण नागपुरात बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. भविष्यात येथे रिफायनरीसुद्धा होण्याची शक्यता आहे. (A refinery is also likely to be built here in the future)
नागपूरमध्ये पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासंदर्भात आर्थिक आणि तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्राच्या मार्केटिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट विभागाने काढले आहेत. विदर्भाच्या विकासासाठी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी विदर्भ जनकल्याण संस्था (वेद) सातत्याने प्रयत्न केले जात होते. त्यांच्या प्रयत्नांना उपरोक्त आदेशामुळे मोठे यश आले असल्याचे दिसून येते.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडकडून (ईआयएल) त्यावर काम सुरू केले होते. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी वेदच्यावतीने कोकणात विरोध होत असेल तरी रिफायनरीसुद्धा विदर्भात आणावी अशी मागणी केली होती.
रिफायनरीसाठी समुद्राची आवश्यकता असल्याने ती फेटाळून लावण्यात आली होती. मध्यंतरी केंद्रीय पेट्रोलियममंत्री चंद्रपुरात (Chandrapur) आले असता रिफायनरीचे तीन तुकडे केले जातील. त्यांपैकी एक विदर्भात स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हालचालींनी वेग आला होता. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या (ईआयएल) तज्ज्ञांच्या पथकाने दीड महिन्यापूर्वी बुटीबोरी येथील जागेची पाहणी केली.
बुटीबोरीमध्ये तीन हजार एकर जागा उपलब्ध आहे. प्रकल्पस्थळापासून वाहिनीसाठी समृद्धी महामार्ग आणि पाण्यासाठी रामा धरण जवळ आहे. याचीही कंपनीच्या तज्ज्ञांनी माहिती घेतली होती. त्यावर ‘एन्क्वॉयरी डॉक्युमेंट’ तयार झाले आहे. एमआयडीसीने (MIDC) दोन कोटी ४९ लाख ५० हजार रुपयांची ऑफर प्रस्तावित पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी सादर करण्यास दिली होती. ती स्वीकारण्यात आली आहे.
२१ आठवड्यांचा आत अंतिम अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नागपूर (Nagpur) आणि एकंदरीतच विदर्भाच्या (Vidarbha) आर्थिक विकासासाठी ही मोठी घडामोड मानली जात आहे. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारल्यास अनेक मोठ्या उद्योगांची पावले विदर्भात पडतील, अशी आशा स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे. कॉम्प्लेक्स आल्यास भविष्यात रिफायनरीसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.