Nagpur Ganeshpeth S.T. News : मराठा आंदोलनामुळे सलग चार दिवस नागपूर विभागातून मराठवाड्याला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. या दरम्यान १४ हजार १४१ किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे महामंडळाचे तब्बल आठ लाखांचे नुकसान झाले. मात्र, रद्द करण्यात आलेल्या ठिकाणी काल (ता. ५) सर्व गाड्या नियमितपणे पाठविण्यात आल्या. (Bus trips to Marathwada were cancelled)
कालपासून बसेस सुरू झाल्यामुले प्रवाशांची गैरसोय टळली. जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनकर्ते आणखी संतप्त झाले. याचे लोन मराठवाड्यासह (Marathwada) राज्यभर पसरले. निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांकडून एसटी बसेसची जाळपोळ करण्यात आली.
एकाच दिवसात १९ बसेस पेटवून दिल्याने महामंडळाचे चार कोटींच्या वर नुकसान झाले. ही भीषण परिस्थिती पाहून नागपूर (Nagpur) विभागातील एसटी महामंडळाने या मार्गावर जाणाऱ्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांत २ ते ४ सप्टेंबरपर्यंत ४१ फेऱ्यातून १४ हजार १४१ किलोमीटर रद्द करण्यात आल्याने महामंडळाचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, सोलापूर आणि पुणे (Pune) या ठिकाणच्या मुख्यतः बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. काल, मंगळवारी या सर्व रद्द केलेल्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे नियमित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
विद्यार्थ्यांची झाली होती दमछाक..
मराठा आंदोलनामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि महामंडळाचे होणारे नुकसान या दोन्ही बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने बस फेऱ्या रद्द केल्या होत्या. विदर्भातून तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी नागपूरला आलेल्या उमेदवारांची मोठी दमछाक झाली होती. भर उन्हात बसची वाट पहात प्रवासी उकाडा सहन करून घामाच्या धारा पुसत होते.
गणेशपेठ मध्यवर्ती स्थानकाच्या फलाट क्रमांक १३ वरून पंढरपूर, लातूर, नांदेड, परभणी, अंबेजोगाई, पुसद, छ. संभाजीनगर, यवतमाळ या ठिकाणी बस जातात. या फलाटावर कालपर्यंत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
सोमवारी तलाठीचा पेपर देऊन स्थानकावर आलेले परीक्षार्थी तसेच मराठवाड्याकडे जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने उभे होते. दुपारची रणरणती ऊन, उकाड्याने प्रवासी घामाघूम झाले होते. विद्यार्थांनी कसेबसे आपले गाव गाठले होते. आज मराठडवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस सोडण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.