Bhandara District Political News : भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत सुरू झालेले नाराजी सत्र अद्याप संपले नाही. ‘प्रकाश’पर्वावर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा अंधार अधिक गडद होताना दिसत आहे. भाजपला या पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा तोटा येत्या काळात सहन करावा लागेल, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. (The resentment session that started internally in the BJP is not over yet)
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या नाराजीचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. हे सध्याच्या घडामोडींवरून दिसू लागले आहे. नानांनी भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांना मायेने जवळ करण्यात सुरुवात केली असल्याचे सध्याच्या हालचालींवरून दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात भाजप तालुका अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपचे प्रमोद प्रधान व नूतन कांबळे हे दोन उमेदवार होते. या निवडणुकीत प्रमोद प्रधान जिंकले आणि नूतन कांबळे पराभूत झाले होते. दरम्यान, तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी चर्चेत आली. साहजिकच पराभूत नूतन कांबळे व त्यांचा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
नाराजी दूर करण्यासाठी भाजपने नूतन कांबळे यांची जिल्हा किसान आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली खरी. मात्र, तरीही ही नाराजी कायमच होती. ही बाब नाना पटोले यांनी चांगलीच हेरली आणि २६ सप्टेंबरला लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या पाहणीसाठी आलेले नाना पटोले नूतन कांबळे यांच्या भेटीला त्यांच्या गावी टेंभरीला पोहोचले. नूतन कांबळे यांचा २६ सप्टेंबरचा वाढदिवस आणि त्यातही भाजपवर त्यांची असलेली नाराजी.
आता या नाराजी फायदा नाना घेणार नाहीत, तर ते नाना कसले. ठरलं मग, नूतन कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा. या वेळी नानांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केक बोलावून घेतला. या वेळी आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत नूतन कांबळे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांच्या उपस्थितीत केक कापल्यावर पटोलेंनी नूतन कांबळे यांना केक भरविला. विशेष म्हणजे हा वाढदिवस आवर्जून सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, मनोहर राऊत, माजी गटनेता रामचंद्र राऊत, प्रकाश देशमुख, सुनील तोंडरे, निकेश दिवटे, गोपाल पारधी, यशवंत लांडगे, सुधाकर मेश्राम, गजानन दोनाडकर, वामन मिसार, भारत इंगळे, माजी सरपंच होमराज ठाकरे यांसह अन्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आता काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते स्वतः केक घेऊन भाजप पदाधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले, मग चर्चा तर होणारच. साहजिक या घटनाक्रमामुळे भाजपमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाना पटोलेंनी कॉंग्रेसचा दुपट्टा न घालता केवळ केक कापून भाजप पदाधिकाऱ्याला गळाला लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात नूतन कांबळे यांनी कमळ फेकून काँगेसचा ‘हात’ हातात घेतला तर नवल वाटायला नको. ‘प्रकाश’पर्वात गडद होत चाललेला अंधार दूर करण्यासाठी भाजप नेत्यांनी पावले उचलण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.