नागपूर : अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा (Navnit Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने पत्नी आणी १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत घरठाव केला. पिडीत महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, खासदार नवनीत राणा यांनी तिच्यासोबत अश्लील भाषेत संभाषण केले. यासंदर्भात त्या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार खासदार राणा यांना नोटिस बजावण्यात आली आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.
यासंदर्भात रुपाली चाकणकर म्हणाल्या, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील एका पिडीत महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली. त्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि तिच्यासह तिच्या १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडले. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे तिचा पती हा खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा पदाधिकारी आहे आणि खासदार नवनीत राणा यांनी पिडीत महिलेची तक्रार ऐकून न घेता, दाखलही न होऊ देता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केले.
पिडीत महिलेने नवनीत राणा यांना कॉल केला असता, तिचा नंबर ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून खासदार राणा यांना कॉल केला असता, त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत पिडीत महिलेशी संवाद साधला. खासदार राणा यांनी आपल्यासोबत जे संभाषण केले, ते अतिशय अश्लील भाषेत केले होते आणि ते मानहानी करणारे होते अशी तक्रार पिडीत महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. यासाठी खासदार राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही पिडीत महिलेने केली आहे. त्याची दखल घेत त्याच दिवशी म्हणजे १७ जानेवारीलाच राज्य महिला आयोगाने नवनीत राणा यांना नोटिस बजावली आहे आणि संबंधित घटनेचा खुलासा मागितला आहे, असे त्या म्हणाल्या.
थेट आणि फटकळपणे बोलण्यासाठी खासदार नवनीत राणा ओळखल्या जातात. पण त्यांनी कुणाशी अश्लील भाषेत संभाषण केल्याचे आजवर ऐकिवात नव्हते. पण या तक्रारीनंतर ही बाब समोर आली आहे. खासदार राणा यांनी तक्रार ऐकूनही घेतली नाही आणि आरोपिला पाठीशी घातले. पण पिडीत महिलेने हार न मानता राज्य महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला. आता नवनीत राणा नोटीसला काय उत्तर देतात आणि हे प्रकरण काय वळण घेते, याकडे अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.