
Gadchiroli News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन सुमारे दहा दिवस उलटले आहेत. आता हिवाळी अधिवेशनाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाही महायुतीमधील खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही.
कोणाला किती आणि कुठले खाते द्यायचे याचे महायुतीच्या तीनही पक्षात चर्चा सुरू आहे. यात आता गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठीसुद्धा महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे पुढे आले आहे.
गडचिरोलीचे पालकमंत्रीपद यावेळी आम्हाला देण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असल्याचे समजते. मात्र हा जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्याकडे किंवा आपल्या खास विश्वासू मंत्र्याकडे ठेवणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा आपल्याकडे ठेवला होता. याच काळात सूरजागड प्रकल्पाचे काम सुरू झाले होते.
गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा संकल्प फडणवीस यांनी सोडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नवे वारे वाहू लागल्याने सर्वांनाच येथील पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचे असल्याचे दिसून येते.
महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao baba Atram) यांना गडचिरोली ऐवजी गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आले होते.
आत्राम यांनी त्यावेळी फडणवीस आमचे नेते आहेत असे सांगून गडचिरोलीवरचा दावा सोडला होता. त्यांना लोकसभेची निवडणूक लढायची होती. विधानसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी बाबा आत्राम यांनी आपल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात सूरजगड इस्पात कंपनीला मोठ्या प्रमाणात जमीन देऊ केली.
या प्रकल्पातून आपण आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगार देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे आहे. राज्यात कुठलेही खाते दिले तरी चालेल मात्र पालकमंत्री गडचिरोलीचेच त्यांना हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीसुद्धा गडचिरोली आम्हाला देण्याची मागणी केली असल्याचे समजते.
शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपचा गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आजवर देण्यात आले होते. यावेळी आम्हाला देण्याची त्यांनी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्याकडे केली असल्याचे कळते.
धर्मराव बाबा आत्राम यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याऐवजी आदिवासी विकास खाते देण्याची मागणी केलीआहे. खाते वाटपात समझोता होण्याची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्यता वर्तविली जात आहे. मात्र पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.