Buldhana NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस ईडी कडुन देण्यात आली होती. त्यामुळे पाटील आज (२२ मे) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'ईडी'चा निषेध केला. या वेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन व निदर्शने होत आहे. जयंत पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, त्याना ईडीच्या माध्यमातून अडकवण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करत आहे. राज्यात अनेक नेत्याची ईडी ने चौकशी केली. मात्र, त्यामधून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे ते म्हणाले. रास्ता रोको झाल्यानंतर तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ''लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. मात्र, आज देशात विशेषता बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी (ED), सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.''
''माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांना 14 महिने तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र, चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतठी सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात सत्ताधाऱ्यांनी सुरू असलेले हे उद्योग आहेत.''
''संपूर्ण देशाने पाहिले आहे. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकार पाडण्याचे असत्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सद्याच्या सरकारची ओळख झाली आहे, असेही काझी म्हणाले. विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. हेच चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रातही दिसू शकेल.''
''विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाठी करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधानकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.''
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शहराध्यक्ष सिताराम चौधरी जिल्हा, तालुका अध्यक्ष सतीश काळे, शिवाजीराव राजे, जगनराव सहाने, मधुकर गव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शेख यासीन, विजय तायडे, शाम मेहेत्रे, परमेश्वर किंगर, मुरली राठोड, रामदास बारवकर, सचिन मांटे, हरिश्चंद्र चौधरी, परमेश्वर सोळुंके, केशव सोळंके, गणेश किंगर, गजानन मानवतकर, सतीश सरोदे, आरेफ चौधरी, राजू आप्पा बोंद्रे, नरूभाऊ तायडे, खलील कुरेशी, चंद्रकांत बनसोड, संजय मेहेत्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.