Nitin Gadkari News: गडकरींच्या नागपुरातच आता लोकांचा सिमेंट रस्त्याला विरोध; आमदाराला धरले धारेवर...

Nagpur Pune : सिमेंट रस्त्यांच्या शेजारी सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजच नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत गेली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Nagpur : देशभरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, भव्यदिव्य उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधल्यामुळे जागतिकस्तरावर चर्चेत आलेले नाव म्हणजे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी. राज्यात बांधकाममंत्री असल्यापासून त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे त्यांना ‘रोडकरी’ असेही संबोधले जाते. परंतु त्यात गडकरींच्या नागपुरात आता लोकांनी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला विरोध सुरू केला आहे. अगदी रस्त्यावर उतरत नागरिकांनी यासाठी आमदारालाही धारेवर धरले.

राज्यात बांधकाममंत्री असताना नितीन गडकरी यांनी नागपूरचा चेहरामोहरा बदलून टाकला. नागपुरातील रस्ते चौपदरी झालेत. अनेक उड्डाणपूल, भुयारी मार्ग नागपुरात झालेत. त्यामुळे देशाच्या नकाशात नागपूरचा नावलौकिक झाला. केंद्रात मंत्री झाल्यानंतर तर गडकरींनी नागपूरसह देशभरात सिमेंट रस्त्यांच्या कामाचा सपाटाच लावला. देशातील दुर्गमातील दुर्गम भाग पक्क्या रस्त्याने जोडला गेला, पण आता त्याच गडकरींच्या शहरातील लोक सिमेंट रस्त्याला तीव्र विरोध करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari
Rohidas Munde News : दिव्यात भाजपला धक्का; रोहिदास मुंडे ठाकरे गटात प्रवेश करणार

सिमेंट रस्त्यांमुळे पाणी आले घरात

२३ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठी नदी किंवा समुद्र नसतानाही अख्खे नागपूर पाण्याखाली बुडाले. परिस्थिती इतकी बिकट झाली की एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कराला नागरी वस्त्यांमध्ये बोटींच्या साह्याने बचाव कार्य करावे लागले. उंच सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले. सिमेंट रस्त्यांच्या शेजारी सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजच नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत गेली. अनेक मजली अपार्टमेंटमधील तळ मजल्यातील घर तर छातीपर्यंत पाण्यात बुडाली होती. नागपुरात आलेल्या या महापुरामुळे आता लोक सिमेंट रस्त्यांना घाबरत आहेत. त्यामुळे लोकांनी सिमेंट रस्त्यांना विरोध सुरू केला आहे.

नागपुरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शंकरनगरात तर लोकांनी रस्त्यावर उतरून सिमेंट रस्त्याला विरोध केला. या भागात ५०० मीटरचा सिमेंट रस्ता बांधला जाणार आहे. रस्ता बांधल्यानंतर त्याची उंची वाढेल. रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजच नसल्याने हे पाणी लोकांच्या घरात शिरेल ही बाब वेळीच लक्षात आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी काम बंद पाडले. इतकेच नव्हे तर या भागातील काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनाही धारेवर धरले. ‘या भागात सिमेंट रस्ता बांधण्याची गरजच काय आहे. घरांपेक्षा जास्त उंचीवर रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे मुसळधार पावसात घरांमध्ये पाणी शिरेल’, असा युक्तिवाद करीत लोकांनी काम बंद पाडले.

‘आमच्या आतल्या गल्ल्यांमध्ये सिमेंट रस्त्याची खरोखर गरज आहे का ? जर हाच विकास आहे, तर आम्हाला तो नको आहे. आम्हाला विचारले होते का की सिमेंट रस्ता हवा की डांबराचा ’, अशी सरबत्ती लोकांनी आमदार ठाकरे यांच्यावर केली. त्यामुळे अखेर या भागातील सिमेंट रस्त्याचे काम तूर्तास थांबविण्यात आले.

नागपुरातील सिमेंट रस्त्यांमुळे शहराचा कायापालट झाली ही वस्तुस्थिती आहे. परंतु पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही ड्रेनेज व्यवस्थाच नागपूर शहरात नाही. आजही नागपुरात ब्रिटिशकालीन ड्रेनेज व्यवस्था आहे. या ब्रिटिशकालीन ड्रेनेजचे जाळे कसे पसरले आहे, हे कुणालाही ठाऊकच नाही. त्याचा कोणताही नकाशा नागपूर महापालिकेजवळ नाही. नकाशाच काय तर अशी व्यवस्था आहे, हे ठामपणे सांगणारा कुणी व्यक्तीही नागपूर महापालिकेजवळ नाही. त्यामुळे नागपुरात मोठी प्रवाही नदी, समुद्र नसतानाही येथे महापूर येतो. अलीकडेच २३ सप्टेंबरला झालेल्या पावसाचे खापर भाजपच्या नेत्यांनी व महापालिका प्रशासनाने ‘ढगफुटी’च्या नावावर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय मौसम विभागाच्या आकडेवारीवरून ढगफुटी सिद्ध झाली नाही. त्यामुळे नागपुरातील पुराला ड्रेनेज व्यवस्था नसणे हे एकच कारण असल्याचे स्पष्ट झाले. यावरूनच आता सिमेंट रस्त्यांना विरोध सुरू झाला आहे.

Nitin Gadkari
Pankaja Munde News : भाजप ही वडिलांची प्रॉपर्टी हा पंकजाताईंचा गैरसमज आता दूर होईल !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com