Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्राची (Maharashtra) उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना सभागृहात स्थान मिळत नसल्याने वैदर्भीय आमदारांच्या मनात खदखद होत आहे. नागपूर (Nagpur) अधिवेशनात विदर्भाकडेच दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना पुसदचे आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर सहा महिन्यापासून ‘ईडी’ सरकार आले. परंतु या सरकारनेसुद्धा महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच विदर्भाच्या प्रश्नांकडे अजूनपर्यंत लक्ष दिलेले नाही. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष असो अथवा वीज तुटवडा, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीचा प्रश्न असो वा अतिवृष्टी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात तरी विदर्भातील प्रश्न सभागृहात विचारण्याची संधी वैदर्भीय आमदारांना न मिळाल्याने त्यांच्या नाराजीचा सूर आहे.
आमदार इंद्रनील नाईक म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना अग्रक्रमाने प्रश्न तालिकेत वरचे स्थान मिळाले पाहिजे. ही भूमिका आपण विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते अजित पवार यांच्यापुढे मांडली. सभागृहात सर्वप्रथम प्रश्न विचारण्याची पक्षाच्यावतीने संधी मला दिली. परंतु सभागृहातील गोंधळ, निलंबन, बहिष्कार या गोष्टींमुळे मी अभ्यासपूर्ण तयार केलेल्या विदर्भातील सर्वंकष प्रश्नांवर सभागृहात जागा मिळाली नाही. विशेषतः यवतमाळसह पश्चिम विदर्भातील आमदारांना याही आठवड्यात वाटच बघावी लागणार का?
आमदार बच्चू कडूंनी धरले धारेवर..
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारला चांगले धारेवर धरले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रियेत बदल केल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याला निवडणूक लढवीता येणार आहे. अशा स्थितीत यंत्रणेवर येणारा ताण त्यांनी सभागृहात सांगितला.आता जुनी यंत्रणा बदललीच आहे, तर सरपंचांसोबतच थेट जनतेतूनच मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडा, असा उपरोधिक टोला त्यांनी लावला. विदर्भातील असा बुलंद आवाज कुणीही सभागृहात काढला नाही.
नाही म्हणायला पुसदचे वरिष्ठ सभागृहातील आमदार नीलय नाईक यांनी पुसद तालुक्यातील टोकावरील ईसापुर येथील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या प्रश्नावर व प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनावर सभागृहात प्रश्न विचारला, त्यावर मंत्री शंभूराजे यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन नीलय नाईक यांना दिले. उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, विदर्भाच्या प्रश्नावर जिल्ह्यातील आमदारांची चडफड दिसून आली नाही. आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या पुसद रिंग रोडचा लक्षवेधी प्रश्नही ‘क्यू’मध्ये आहे. विदर्भ त्यातही पश्चिम विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना स्थान न मिळणे, या 'बॅकलॉग' बद्दल आमदारही नाराज आहेत.
नागपूर कराराप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्याची प्रथा आहे. यावेळी तीन वर्षानंतर नागपूरला अधिवेशनाचे भाग्य लाभले आहे. वास्तविक पाहता विदर्भातील प्रश्न या अधिवेशनात सुटावेत, अशी अपेक्षा असते. नवीन युवा आमदारांना आपल्या भागातील प्रश्न मांडण्याची संधी मिळावयास हवी. प्रत्यक्षात अधिवेशनाचे कामकाज वेगळ्या दिशेने चालत असल्याने वैदर्भीय प्रश्नांना बगल मिळत दिली जात आहे. मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असा प्रश्न वैदर्भीय आमदारांना पडला आहे. विदर्भातील प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा आमचा अधिकार आहे. तो हक्क आम्ही घेऊच. या आठवड्यात संधी मिळताचविदर्भाचे प्रश्न उजागर करू. विदर्भाच्या प्रश्नांवर जागर करू, असे आमदार इंद्रनील नाईक म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.