यवतमाळ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील एकमेव आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक यांनी शिवसेनेत कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्याचे जाहीर करताच राजकारणात एकच खळबळ उडाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते मातोश्रीवर प्रवेश घेणार असे सांगितले जात होते. परंतु, या प्रवेशासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती खुद्द इंद्रनील नाईक यांनी दिली.
पुसदचे आमदार मनोहर नाईक हे शिवसेनेत जाणार, अशी चर्चा दबक्या आवाजात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्याला कोणताही आधार नव्हता. परंतु, त्यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी शिवसेनेत जाण्याची घोषणा करताच त्यांच्या शिवसेना प्रवेशाला बळकटी मिळाली.
इंद्रनील यांनी कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुसद येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत मनोहर नाईकांनी ययाती व इंद्रनील या आपल्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्यावे, असे आवाहन केले.
त्यानंतर आमदार मनोहर नाईक व पुसदच्या नगराध्यक्ष असलेल्या त्यांच्या पत्नी अनिता नाईक यादेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. पक्षप्रवेशाची तारीख 30 जुलै ठरली होती. मात्र काल त्यांचा प्रवेश न झाल्यामुळे तो कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता जनतेला लागलेली आहे.
याबाबत इंद्रनील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वडिलांचे काही कार्यकर्ते प्रवेशावरून नाराज आहेत. त्यांची समजूत काढणे सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईला प्रवेश घेण्यात येईल, असे इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.