नागपूर : वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन अधिग्रहणाच्या पद्धतींमध्ये फरक असल्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वणी ते वरोरा आणि आर्णी या गावांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. या अडचणी केव्हा दूर होतील, असा प्रश्न कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी आज लोकसभेत मांडला. त्यावर या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारकडे मागणी करावी लागेल, असे उत्तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री विजयकुमार सिंह (Vijaykumar Singh) यांनी दिले.
खासदार धानोरकर म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वणी ते वरोरा या रस्त्याचे काम करताना शेंबळ आणि पाटाळा या गावांतील जमिनीच्या अधिग्रहण पद्धतीमध्ये फरक करण्या आला. राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या कामात यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी या गावाजवळील जमिनीचे अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम रात्रीच्या वेळेला करण्याची परवानगी महाराष्ट्र खनिकर्म विभागाने दिलेली नाही. परिणामी कामाची गती मंदावली आहे.
वेकोलिचे ओव्हर बर्डन रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येते. पण त्यासाठी महाराष्ट्र खनिकर्म विभाग आणि वेकोलि महसूल आकारत आहे. दुप्पट महसूल आकारला जात असल्यामुळे ठेकेदाराचे नुकसान होत आहे. त्यामुळे कामाची गतीही मंदावली आहे. या कामांमध्ये एक नव्हे तर अशा अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या केव्हा दूर होणार, असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी आज सभागृहात उपस्थित केला.
प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री विजयकुमार सिंह म्हणाले, ही फक्त वणी, वरोरा किंवा फक्त आर्णीची समस्या नाही, तर संपूर्ण देशाची समस्या आहे. अशा कामांसाठी महसूल राज्य सरकार आकारत असते. कामाचा कालावधीसुद्धा राज्य सरकार निर्धारित करीत असते. राज्य सरकारकडे मागणी केल्यास या सर्व समस्या निकाली निघू शकतात. कारण देय असलेला मोबदला राज्याचा महसूल विभाग आकारतो. राज्याच्या महसूल विभागाने निर्धारित केलेला मोबदला एनएचएआयकडून (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) देण्यात येतो.
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करून खासदार धानोरकरांनी यातील समस्या मार्गी लावल्या आहेत. लवकरच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या दोन्ही कामांतील अडचणी दूर करून रस्त्याची कामे मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.