Chandrapur Politics.
Chandrapur Politics.Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : चंद्रपुरात भाजपचे चिंतन, काँग्रेसचा 'पोर'खेळ

Chandrapur Constituency : पराभव जिव्हारी लागल्यानंतर पुन्हा कमळ फुलविण्याची तयारी. काँग्रेसच्या गटातून ठरेना उमेदवारांचे नाव. पक्षांतर्गत राजकारणामुळे अनेकांना चिंता.

Lok Sabha Election 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीचा (2019) पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाजपने त्याच दिवसापासून चंद्रपूर लोकसभेत पुन्हा कमळ फुलविण्याची तयारी सुरू केली. मात्र या मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक समीकरण बघता अद्याप भाजप आपला उमेदवार निश्चित करू शकलेली नाही. पक्ष आणि पक्षाबाहेरील उमेदवारांच्या नावावर भाजपची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असताना उमेदवारीचा घोळ घालत काँग्रेसने 'पोर'खेळ सुरू केला आहे. ही ‘मॅच फिक्सिंग’ची तयारी आहे, असा संशय महाविकास आघाडीच्या समर्थकांना येत आहे.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या लोकसभेच्या 2009 मधील निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला 29 तर 2014 मध्ये 24 टक्के मते मिळाली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी इतिहास घडविला. 45 टक्के मते घेत राज्यातील ते काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. 2014 मधील निवडणुकीच्या तुलनेत धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या मतांत 21 टक्क्यांची वाढ झाली. खासदार धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसला अस्तित्व टिकवायचे असेल तर 21 टक्क्यांची वाढ कायम ठेवणारा उमेदवार हवा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur Politics.
Chandrapur ZP : जिल्हा परिषदेची शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्यांची धडपड

भाजपला 21 टक्क्यात भगदाड पाडणाऱ्या उमेदवाराचा शोध आहे. काँग्रेसच्या पोरखेळाला कंटाळून कुणी हाती लागेल काय याच्या प्रतीक्षेत भाजप आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली. धानोरकर उमेदवार असतील, असे गृहीत धरल्या जात होते. तोपर्यंत कुणी दावेदारीसुद्धा केली नाही. मात्र पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. त्यांच्या लोकसभा लढण्याच्या निर्णयाचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागतच केले. मात्र त्यानंतर अचानक वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव समोर केले. त्यात वावगे काही नाही. गावखेड्यांतील काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.

भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाहीत, असे सांगितले जात आहे. अहीरांचे पक्ष ऐकायला तयार नाही. मध्यंतरी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अहीरांच्या मदतीसाठी दिल्लीला जाऊन आल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यासाठी काँग्रेसच पोषक वातावरण तयार करीत आहे. आमदार प्रतिभा धानोरकरांसाठी त्यांची फिल्डिंग सुरू आहे. त्या काँग्रेस सोडायला तयार नाहीत. आता वडेट्टीवार स्वतःच्या मुलीसाठी या मतदारसंघातून आग्रही आहेत. या सर्व घटनाक्रमावर आमदार धानोरकर यांनी मौन बाळगले आहे. आता शहरातील काही 'शिष्ट' लोकांचे मंडळ धानोरकरांविरोधात दिल्ली जाणार आहे. एक माजी नगरसेवक यासाठी जुळवाजुळव करीत असल्याची माहिती आहे. अशात धानोरकरांविरोधात आतापर्यंत आपला वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर यातील काहींनी या जत्रेत सामील होण्यास नम्रपणे नकार दिला. काँग्रेसच्या संसदीय समितीकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सुभाष धोटे यांची पाठविली गेली आहेत.

Chandrapur Politics.
Chandrapur BJP News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना अजूनही उमेदवारी मिळण्याची आशा; म्हणाले, मी मैदानात आहे !

'कमल'नाथ पॅटर्न

मध्य प्रदेशात काँग्रेस हमखास विजय होईल, असे अनेक निवडणूकपूर्व सर्वेक्षणात समोर आले होते. प्रत्यक्ष निकाल मात्र वेगळा लागला. मध्य प्रदेशात 'कमल' फुलविण्यात एका 'नाथा'ची भूमिका महत्वाची होती, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. भाजप निवडणुकीच्या रिंगणात अनेक आघाड्यांवर काम करते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना थेट भाजपात सामील करून घेतले जाते. काहींना त्याच पक्षात ठेवून भाजपचे काम करायला 'भाग' पाडले जाते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसमध्येही भाजपने काही 'नाथ' तयार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खासगीत भाजपचे नेते आम्ही ठरवू तो काँग्रेसचा उमेदवार असेल, असा दावा करीत आहेत. काँग्रेसचा तिकीट वाटपाचा इतिहास फार मनोरंजक राहिला आहे. राजकारणाशी संबंध नसलेले आणि निवडणुकीपूर्वी एकही दिवस बल्लारपूर विधानसभेत पाय न ठेवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विकास झाडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ज्यांची 2019 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात घोळ घातला, त्याच राज्य आणि केंद्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांवर उमेदवारी देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यामुळे भाजप शतप्रतिशत निश्चित मानली जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Chandrapur Politics.
Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com