Vanchit Bahujan Aghadi : महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळणार नाही, यामागील खरे सूत्रधार जर कोणी असेल तर ते भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. आंबेडकर हे वाशीम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रचार माध्यमांशी बोलताना हा सनसनाटी आरोप केला. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाहीये, असा दावा आंबेडकर यांनी केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ही बाब खरी आहे. परंतु त्यांना हे आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यामुळं त्यांनीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयात सरकारच्यावतीने युक्तीवाद करू नका, असं सांगिल्याचा दावा अॅड. आंबेडकर यांनी केला. ठरल्याप्रमाणे वकिलांनी न्यायालयात कोणताही युक्तीवाद केला नाही. तारखांना अनुपस्थित राहिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही.
महाराष्ट्राने मराठा आरक्षण गमाविल्यानंतर त्याचं खापर महाविकास आघाडीवर व विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर फुटलं, असा अॅड. आंबेडकर यांच्या बोलण्याचा रोख होता. नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिकाच कुचकामी आहे. जनतेच्या प्रश्नावर सध्या राज्यात केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलताना दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेरही आपलं अस्तित्व गमावून बसलीय, असा टोलाही त्यांनी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना हाणला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडीला राज्यात महाविकास आघाडीत आणि केंद्रात ‘इंडिया’ आघाडीत समाविष्ठ करून घेण्याचा मुद्दा आता दोन्ही आघाड्यांपुढं आहे. त्यावर त्यांना निर्णय घ्यायचा आहे. आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये ‘वंचित’चा समावेश न झाल्यास डिसेंबर अखेरपर्यंत काय ती भूमिका घेणार असल्याचं अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. एकत्र लढण्याचा फायदा राज्यात महाविकास आघाडीला आणि केंद्रात ‘इंडिया’ आघाडीला होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
अलीकडेच विविध मुद्द्यांवर नागपूर येथील विधान भवनावर अनेक मोर्चे काढण्यात आलेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसींचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, मातंग समाजाचे मुद्दे, दिव्यांगांच्या समस्या आदींचा यात समावेश होता. या सर्व आंदोलनांमधील नेत्यांनी आपापल्या मागण्या शक्य तितक्या लवकर सरकारकडून मान्य करून घ्याव्यात. डिसेंबरनंतर आचारसंहिता लागू झाल्याची पळवाट राज्य आणि केंद्र सरकार काढेल, अशी सूचनाही अॅड. आंबेडकर यांनी सर्व आंदोलकांना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.