Prime Minister Narendra Modi : म्हणजे स्वप्नं विकणारे सेल्समन !

Vikas Thakre : केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका आमदार विकास ठाकरे यांनी केली.
Vikas Thakre and Narendra Modi
Vikas Thakre and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Budget 2023 News : केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प (Budget) म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

पूर्वी ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. ती मर्यादा आता ७ लाख रुपये केली आहे. मात्र, महागाईचे वाढते प्रमाण पाहता ही सवलत बाजारातील मागणी वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. त्यातच डॉलरची किंमत ८२ रुपयांवर गेल्याने आयात महाग होऊन त्याचा थेट फटका मध्यमवर्गीयांना बसेल. त्यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दुसरे तिसरे कुणी नसून केवळ स्वप्नं विकणारे सेल्समन आहेत, अशी टिका आमदार ठाकरे (Vikas Thakre) यांनी केली.

जुलै २०२२ पासून आजवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सुमारे ३७ डॉलर्स प्रती बॅरलने घट झाली. पेट्रोल-डिझेलच्या सर्वसामान्य किरकोळ ग्राहकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. इंधनावरील करांच्या रचनेतसुद्धा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे केवळ एक मृगजळ उभे करण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १० लाख कोटी रुपये भांडवली खर्चाची घोषणा केली आहे. २०२०-२१ मध्ये भांडवली खर्च ४.३९ लाख कोटी रुपये होता. तेव्हापासून दरवर्षी हा खर्च वाढवला जात असताना रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढताना का दिसून येत नाही, असा सवाल आमदार ठाकरे यांनी केला. ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मनरेगाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत २१.६६ टक्क्यांची कपात करून यंदा जेमतेम ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोजगार निर्मितीसाठी यावेळच्या अर्थसंकल्पात सकारात्मकता दिसत नाही. मागील ९९ महिन्यांपासून निर्यातीच्या वाढीचे प्रमाण उणेमध्ये आहे. त्यामुळे निर्यातीला खीळ बसली असून, त्याचाही थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. चालू खात्यात ४.४ टक्के तूट आहे. पुढील वर्षात वित्तीय तुटीचा ५.९ टक्क्यांचा आकडा अवास्तव वाटतो. त्यामुळे केंद्र सरकार ज्या तरतुदी दाखवत आहेत, त्या प्रत्यक्षात उतरणार नसल्याचीच शक्यता अधिक असल्याचे विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.

Vikas Thakre and Narendra Modi
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

भाजपचे केंद्र सरकार दरवर्षी मोठमोठे आकडे जाहीर करते. नवनवीन घोषणा केल्या जातात. मात्र, त्या घोषणांची अंमलबजावणीच होत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात युपीए-१ व युपीए-२ च्या तुलनेत हमीभाव वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

२०२२ पर्यंत प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे घर असेल, असे सांगण्यात आले होते. त्यावर अंमलबजावणी न झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत फटका बसेल, या भीतीने यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेचा खर्च वाढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी केलेल्या घोषणांचे काय, याबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही उत्तर दिसत नाही, अशी टीकाही आमदार विकास ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com