नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राला एकावर एक धक्के बसत आहेत. आता पुढचा धक्का सोसण्याची वेळ महाराष्ट्रावर आली, असं दिसतंय. कारण अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर तशी पोस्ट केली आहे.
सध्या आलेल्या संकटातून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) तरणार की डुबणार? नव्याने सरकार स्थापन झाल्यास सरकार कुणाचे असणार? कोणत्या पक्षाची कुणाशी युती होणार, हे सर्व प्रश्न सद्यःस्थितीत महाराष्ट्राला (Maharashtra) भेडसावत आहेत. जो तो आपआपल्या परीने अंदाज आराखडे जोडण्यात लागला आहे. कधी नव्हे ते सामान्य माणूस घरी, बाहेर, प्रवासात महाराष्ट्राच्या या स्थितीवर चर्चा करताना दिसतो आहे.
अशा परिस्थितीत आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी त्यांच्या युवा स्वाभिमान या पक्षातर्फे फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ‘महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा.आ. रवीभाऊ राणा यांचे हार्दिक अभिनंदन’. या पोस्टनंतर राज्यातील जनता आणखी बुचकळ्यात पडली आहे. खरे काय नी खोटे काय, हेच कळायला मार्ग राहिलेला नाही. कारण राणा समर्थकांनुसार भाजपची युती ही शिवसेनेसोबत झाली नसून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत झाली आहे.
आमदार राणा समर्थकांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये भाजप-सेना नव्हे तर भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी युती दिसते आहे. त्यांनी टाकलेल्या फलकावर शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस बाळू इंगोले यांनी ही पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण आता याहूनही वेगळ्या दिशेने तर जाणार नाही ना, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.