Nagpur Politics : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पुन्हा एकदा विदर्भाकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने ठाकरे गटाने आता विदर्भातून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. लवकरच प्रचाराची यात्रा रामटेक लोकसभा मतदारसंघात पोहोचणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आता त्यांच्या अर्धांगिनी रश्मी ठाकरे यादेखील मैदानात उतरल्या आहेत. लवकरच त्या रामटेकमध्ये स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत. यात्रेच्या माध्यमातून रामटेकमधील महिला मतदारांना रश्मी ठाकरे या साद घालणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे रणशिंग यापूर्वीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने विदर्भातून फुंकले आहे. काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी ‘है तयार हम’ ही महारॅली नागपुरात घेतली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने शहरातील कस्तूरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद केला. काँग्रेस आणि ‘वंचित’चा कित्ता गिरवत आता शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही विदर्भातूनच प्रचार सुरू केला आहे.
रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे खासदार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते मुकुल वासनिक यांचा पराभव करीत तुमाने यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले. अशात ठाकरे गटानेही तुमाने यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी रामटेकमध्येच स्त्री संवाद यात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रश्मी ठाकरे यांची स्त्री संवाद यात्रा सुरू झाली असून बुधवारी (ता. 17) ही यात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार आहे. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या विशाखा राऊत, किशोर पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी यात्रेत असतील. ठाकरे गटाकडून यात्रेदरम्यान शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना कसा दगा दिला, यावर भाष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटातील खासदार आणि आमदारांची कथित गद्दारी जनतेसमोर आणण्याची व्यूहरचना केलेली यावरून दिसत आहे.
रामटेक हा शिवसेनेचा किल्ला आहे. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटांसाठी महत्त्वाची आहे, हे लक्षात घेता यात्रेसाठी रामटेकची निवड करण्यात आली आहे. रामटेक, सावनेर, काटोल, नागपूर, हिंगणा, उमरेड, कामठी या भागांमध्ये रश्मी ठाकरे यात्रेसह फिरणार आहेत. मतदारसंघातील महिलांशी संवाद साधत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या खासदार, आमदारांनी कशी गद्दारी केली, याची पोलखोल केली जाणार आहे. कुटुंबातील महिला मनात आणले तर काहीही करू शकते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे महिलांचे मतपरिवर्तन करून त्याचा परिणाम मतदानावर करून घेता येतो काय, हा ठाकरे गटाचा प्रयत्न राहणार आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.