Rashmi Barve : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या न्याय व विशेष साहाय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बर्वे यांच्या निवडणूक लढण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.
ज्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र दिले, तेच अधिकारी प्रमाणपत्र अवैध कसे ठरवू शकतात, असा सवाल रश्मी बर्वे यांनी केला आहे. या विरोधात सध्या त्यांची न्यायालयात धावपळ सुरू आहे. अर्ज छाननीची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे. त्यापूर्वी रश्मी बर्वे यांना दिलासा मिळाला तर ठीक, नाही तर त्यांना ही निवडणूक लढण्यापासून मुकावे लागणार आहे. छाननीच्या वेळेपूर्वी बर्वे यांच्याकडून काही हालचाल न झाल्यास त्या या निवडणुकीत अपात्र ठरणार आहेत.
या सर्व प्रक्रियेमध्ये जातपडताळणी समितीचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण तरीही रश्मी बर्वे यांना न्यायालयाकडून अपेक्षा आहे. छाननीमध्ये अर्ज वैध न ठरल्यास उमेदवारीचा दावा राहात नाही. डमी उमेदवार म्हणून रश्मी यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. रश्मी बर्वे यांचा अर्ज अवैध ठरल्यास श्यामकुमार ही निवडणूक लढतील, असे सांगितले जात आहे. पक्षाचा एबी फॉर्मही त्यांनी जोडलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किशोर गजभियेंचे काय?
रश्मी बर्वे यांचा अर्ज वैध ठरणार नाही, असे काँग्रेस नेते आणि २०१९ मध्ये रामटेकमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेले आणि पराभूत झालेले उमेदवार किशोर गजभिये यांनी आधीच सांगितले होते. त्यांनी प्रयत्न करूनही त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. इकडे रश्मी बर्वे किंवा त्यांचे पती श्यामकुमार बर्वे दोघांचेही अर्ज अवैध ठरल्यास काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेस किशोर गजभियेंना केवळ पाठिंबा देऊ शकेल. पंजा चिन्हावर गजभिये यांची लढण्याची शक्यता नाही.
तातडीने सुनावणी करण्यास हायकाेर्टाचा नकार...
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. आता बर्वे यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होईल, असे सांगण्यात आले आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.