Ravikant Tupkar's Bail : शेतकरी नेते रविकांत तुपकरांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात ठेवावे, अशी मागणी बुलडाणा पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेली आहे. याप्रकरणी आज (ता. 8) सुनावणी पार पडली. न्यायालयात दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला. रविकांत तुपकर यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी सावजी-तुपकर यांनी बाजू मांडली.
तब्बल दोन तास हा युक्तिवाद चालला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे तुपकर यांचा जामीन रद्द होणार की नाही, याचा फैसला आता 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. तुपकर आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्यानं हा निकाल त्यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
आपल्या आक्रमक आंदोलनासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे प्रसिद्ध आहेत. दरम्यान, तुपकर यांच्या आंदोलन व सत्याग्रहांमुळे राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांची जमानत रद्द करून तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी बुलडाणा शहर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी व सर्व सामान्य नागरिकांसाठी रविकांत तुपकर गेल्या दोन दशकांपासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजवर रस्त्यावर उतरून अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. एल्गार महामोर्चा, मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन, अन्नत्याग आंदोलन त्यानंतर नागपूर अधिवेशनावर धडक यांसह इतर आंदोलने करूनही सरकार केवळ आश्वासने देत असल्याने रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
रेल्वे रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 151 (3) अंतर्गत तुपकरांना 18 जानेवारी रोजी अटक करून 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर करून पुढील 14 दिवस स्थानबद्ध ठेवण्यास विनंती पोलिसांनी केली होती. दरम्यान, न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांविरोधात पोलिस स्टेशन बुलडाणा शहर यांनी सत्र न्यायालय बुलडाणा येथे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे.
बुलडाणा शहर पोलिसांनी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलडाणा यांनी 19 जानेवारी रोजी पारित केलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. रविकांत तुपकर यांच्या विरुद्ध 23 निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. रविकांत तुपकर हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यामुळे त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याप्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी न्यायालयात पहिली सुनावणी झाली. रविकांत तुपकर हे स्वतः न्यायालयासमोर हजर झाले होते; परंतु तुपकरांच्या संबंधित कनिष्ठ न्यायालयाचे रेकॉर्ड उपलब्ध न झाल्याने या प्रकरणाची उर्वरित सुनावणी आज 8 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली होती. याप्रकरणी आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर रविकांत तुपकर स्वतः न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद झाला.
रविकांत तुपकर यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे आंदोलन सत्याग्रहाचे आहेत. त्यांच्यावर एकही चुकीचा गुन्हा दाखल नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे, आंदोलन करणे हा गुन्हा ठरत नाही. या देशाला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे, असा युक्तिवाद ॲड. शर्वरी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून, आता याप्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय येणार आहे.
आपण तुरुंगात असलो तरी निवडणूक लढू, अशी प्रतिक्रियाही त्यांनी अगोदरच दिली आहे, तर दुसरीकडे तुपकर यांचा जामीन रद्द केल्यास या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देता येणार आहे. मात्र, बुलडाणा पोलिसांनी तुपकरांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी का केली हा सवाल तुपकर समर्थकांनी विचारला आहे, तर यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.