Nagpur News, 26 July : महायुती सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशानात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा केल्यापासून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली.
मात्र, राज्यभरातील महिलांचा या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरुन देण्यासाठी कॅम्प उभारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती सरकारसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. मात्र, सध्या लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
अजितदादांच्या अर्थखात्याचा तीव्र विरोध असचानाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवाय त्यामुळे आता ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचंही बोललं जात आहे. या चर्चांमुळे आता पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, अशी भीती देखील विरोधक व्यक्त करत आहेत. विरोधकांच्या याच टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असं काँग्रेसचं (Congress) म्हणणे आहे. मात्र, जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा राज्यावर 44 हजार कोटीचा बोजा पडला होता. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता महाराष्ट्र कर्जबाजारी होईल असं बोलला नाही. तेव्हा तुमच्या ओठाला फेव्हिकॉल चिटकवला होता का?, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय आता राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजना लागू करण्यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे समजताच काँग्रेस महाराष्ट्र कर्जबाजारी होईल असं म्हणत आहे," अशा शब्दात मुनगंटीवार यांनी विरोधकांना सुनावलं.
तसंच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेसचं सत्तेत येण्याचं स्वप्न चक्काचूर झाल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात आपली सत्ता यावी हे काँग्रेसचं स्वप्न होतं. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. त्यामुळेच ते आता लाडकी बहीण विरोधात अपप्रचार करत आहेत. ते कधी आम्ही कोर्टात जाऊ म्हणातात, तर कधी महाराष्ट्र कर्जबाजारी होईल म्हणातात. तसंच ते आम्ही ही योजना बंद करु असं सांगून घाबरवतात.
मात्र, ज्यांना या योजनेचे पैसे नको असतील त्यांनी ते घेऊ नये. सरकार मोफत शिक्षण देत आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहे, या सर्वामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुक मुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 10 केबिन तयार करावी लागतील, असा टोलाही मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. तसंच लाडकी बहीण योजनेला विरोध म्हणजे महिलांना विरोध आहे, महाराष्ट्राच्या गरिबांना आणि शेतकऱ्यांना विरोध आहे. त्यामुळे यांना महाराष्ट्रातल्या महिलांनी उत्तर दिलं पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.