Nagpur News: राज्यात 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपतविधी उरकला. या शपथविधीबाबत तेव्हापासून अनेक तर्क विर्तक काढण्यात येत आहे. अजित पवारांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या संमतीनंच मी शपथ घेतली, असा दावा अजितदादांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे.
"आपल्या हातातून निवडणूक जात आहे, कोणताही पर्याय नसतो, तेव्हा खोटं बोलावं लागते, खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे, असा हा केविलवाणा प्रयत्न असावा. तो प्रयत्न अजितदादा करीत आहेत," असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझी विनंती आहे की गौतम अदानी साहेबांना थेट विचारा की काय घडलं. ते मग आपल्याला 'दूध का दूध पाणी का पाणी होईल,' काय घडलं ते कळेल, असे रोहित पवार म्हणाले.
भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास पाच बैठका झाल्या. या बैठकांना गृहमंत्री अमित शहा, उद्योगपती गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मी देखील हजर होतो, असे विधान अजित पवार यांनी केले आहे.
प्रचारसभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले, " या अगोदर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितले की तपासणी करायची असेल तर दोघांचीही करा नाहीतर दोघांची करू नका. लोकं पेटून उठल्यावर आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयोग तपासत आहे. ज्या लोकांनी बॅक तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिले ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न चेक करणाऱ्यावर काय कारवाई केली ते पत्र समोर यायला हवं," असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले,"महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. जवळपास १७० जागा निवडून येतील. सर्वाधिक चांगलं स्ट्राईक रेट विदर्भात असेल. महायुतीच्या कामावर लोक नाराज आहेत. काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत आहे. त्यामुळे लोक समोर बोलत नाही. काही लोक बोलून दाखवत नाही तर करून दाखवत असतात,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.