Sakoli News : आपल्या राजकीय अस्तित्वाची जाण करून देण्यासाठी अधुनमधून माध्यमांमध्ये झळकणारे माजी आमदार सेवक वाघाये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवीन जिल्हा स्थापन करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्याच काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी वाघाये यांचे काँगेसमधील अस्तित्व अद्याप मान्य न केल्याने ‘मी काय म्हणतो.. अधुनमधून दिसणारे माजी आमदार सेवक वाघाये हे करू शकतील का?’, अशा शब्दात चर्चांना जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
सध्या राज्यात केवळ नवी तालुक्यांच्या निर्मितीवर विचार सुरू आहे. नव्या जिल्ह्यांचा कोणताही प्रस्ताव नाही, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळीअधिवेशनात नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे वाघाये यांची मागणी कितपत मान्य होईल, याचा अंदाज येऊ शकतो.
राज्यात नवीन 22 जिल्हे व 39 तालुक्यांच्या निर्मितीबाबत महसूल विभागाकडे यापूर्वीच प्रस्ताव गेला आहे. त्यासाठी राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली होती. त्यात साकोलीच्या नावाचा समावेश होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेकडून होत आहे. ब्रिटिश सरकारने भंडारा जिल्ह्यात तीन उपविभाग तयार केले होते. भंडारा, गोंदिया व साकोली हे ते तीन उपविभाग होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कालांतराने गोंदिया जिल्हा वेगळा झाला. साकोली शहर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराचा थेट राज्य महामार्गावर संपर्क आहे. साकोली सध्या उपविभागाचे ठिकाण आहे. या शहराला नवेगाव बांध, नागझिरा, इटियाडोह या प्रकल्पांचा परिसर लागून आहे. पर्यटनातून भविष्यात या नव्या जिल्ह्याला चांगला वाव आहे. गोंदिया, गडचिरोली, भंडारा या तीनही भागांना साकोली शहर जोडलेले आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, लाखनी, मोरगाव अर्जुनी, लाखांदूर, साकोली तसेच नव्याने निर्माण होऊ पाहणारे अड्याळ, पालांदूर, दिघोरी या तालुक्यांचा मिळून साकोली जिल्हा अस्तित्वात आणणे शक्य आहे. साकोली जिल्हा निर्मिती हे आपलेही स्वप्न आहे. नव्या जिल्ह्याची निर्मितीत जे करतील, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहू, असे सेवक वाघाये याबाबत म्हणाले. प्रत्यक्षात त्यांची मागणी यंदा पूर्ण होईल, असे दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यात ऐकेकाळी राजकीय पटलावर सर्वांत चर्चेतील नाव सेवक वाघाये होते. आमदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून यांची ख्याती होती. विदर्भातील मोठ्या ओबीसी नेत्यांच्या पंगतीत वाघाये असायचे. कालांतराने नाना पटोले यांना त्यांनी उघडपणे विरोध केला. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात ते राजकारणापासून अलिप्त होते. तेव्हापासून अधूनमधून ते माध्यमांपुढे येत असतात. काँग्रेसच्या आंदोलनात किंवा बैठकीतही ते फारसे दिसत नाहीत. अनेक दिवस अज्ञातवासात राहिल्यानंतर आता वाघाये पुन्हा माध्यमांपुढे आले आहेत. त्यामुळे त्यांना अनेकांनी ‘भाऊ असता कुठे?‘, असा प्रश्न नक्कीच केला असेल. अशातच त्यांनी साकोली या नव्या जिल्ह्याची मागणी केली आहे. बहुतांश काळ राजकारणाच्या ‘नेटवर्क’ बाहेर राहात असल्याने वाघाये साकोली जिल्हा निर्मितीचे आव्हान पेलू शकतील का, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.