Yavatmal District Political News : ज्यांना जनतेचा कळवळा नव्हता, अशी मंडळी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपसोबत गेली आहे. आम्ही विकासासाठी सोबत गेलो, असे सांगणे म्हणजे विकास झालाच नाही, याची कबुली होय. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे, दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यामुळे पवारांच्या विचारांचाच आमदार पुसद विधानसभा मतदारसंघात निवडून येईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी व्यक्त केला. (MLA of Pawar's ideas will be elected)
आपला आमदार निवडून आणण्यासाठी तुम्ही संघटन मजबूत करा. पुसदमध्ये (Pusad) राष्ट्रवादी काँग्रेस मजबुतीने उभी राहील. गुणवंतराव देशमुख संकुलात काल (ता. एक) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुसद तालुका कार्यकर्ता संवाद बैठकीसाठी निकम पुसदला आल्या होत्या. यावेळी वर्षा निकम यांनी भाजपच्या धर्मद्वेषी धोरणांवर कडाडून टीका त्यांनी केली.
मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रमुख ॲड. आशिष देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रजनी चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख भास्कर पंडागळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा. शिवाजी राठोड, श्रीराम अंभोरे, माधव वैद्य, सुरेश धनवे, अनिल ठाकूर, साहेबराव पाटील कदम, प्रदेश चिटणीस प्रदीप पाटील देवसरकर, महागाव तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख, फईम अहमद, रामकृष्ण चौधरी, नितीन पवार, राजू दुधे, अशोक राऊत, सय्यद अतिकोद्दीन, शितल कुरडकर, दीपक जाधव आदी होते.
संविधानाची भाषा बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुता, आरक्षण घालविण्याचा भाजपचा (BJP) डाव आहे. अशा लोकांसोबत राष्ट्रवादीतील (NCP) स्वार्थी मंडळी ईडीच्या भीतीपोटी भाजप सरकारमध्ये सहभागी झाली, हे अतिशय चुकीचे पाऊल आहे. हिंदू संकटात आहे, असे सांगणारे लोकच आज दुर्दैवाने सत्तेत आहेत. घटनेने धर्मपालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु आम्ही पुरोगामी हिंदू आहोत. मणिपूरच्या घटनेतून भाजपची कूटनीती दिसून आली.
भाजपने ओबीसीचा गिनीपिग केला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आता भाजपला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. रस्त्यावर उतरावे लागेल. मिस्टर इंडियातील मोगॅम्बोसारख्या राजकारणातील दुष्ट प्रवृत्तीला हरवायचे असेल तर पक्ष संघटनेची वज्रमूठ आवश्यक आहे, असेही निकम म्हणाल्या
चुनावी जुमला अन् कट कारस्थान !
२०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने कट कारस्थाने सुरू केली आहेत. गॅस सिलिंडरचा भाव २०० रुपयांनी कमी करण्याचा चुनावी जुमला आहे. भाजपच्या ढोंगीपणावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन वर्षा निकम यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील छोट्या गावातील सरपंच असताना मला शरद पवारांनी जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिली.
त्यांच्यामुळे महिलांना आरक्षण मिळाले आहे. ते नवतरुणांना संधी देत आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणूक लढवावी. राष्ट्रवादीचा झेंडा दिसलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सुलतानी राजवटीत शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्याविरुद्ध सरकारचा निषेध करण्यासाठीयवतमाळ येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
पुसदच्या नाईक घराण्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्रिपद मिळाले. शरद पवार यांनी सर्वकाही दिले. मात्र, पुसदचे आमदार विकासासाठी नव्हे तर मंत्रिपदासाठी अजित पवारांसोबत गेले, अशी टीका ॲड. आशिष देशमुख यांनी केली. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पवारांसोबत राहून एकनिष्ठता शिकविली. मात्र आजचे नेतृत्व एका कृषिमंत्र्यासमोर जिल्ह्याची मागणी करून लोकांची बोळवण करीत आहेत, अशी बोचरी टीका देशमुखांनी केली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.