बंडाच्या लाटेत वाहून गेली विदर्भातील शिवसेना...

उद्या जर का सभागृहात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पराभव झाला, तर विदर्भात शिवसेनेला (Shivsena) ओहोटी नक्कीच लागणार, हे निश्‍चित
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur NewsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड आता निर्णायक वळणावर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात विश्‍वासमत सिद्ध करावे, असं पत्र राज्यपालांनी आज सकाळीच दिलं आहे. उद्या सभागृहात काय होईल, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेत कधी नव्हे ती अभूतपूर्व फूट पडलेली आहे अन् उद्या जर का सभागृहात महाविकास आघाडीची पराभव झाला, तर विदर्भात शिवसेनेला ओहोटी नक्कीच लागणार, हे निश्‍चित असल्याचे जाणकार सांगतात. (Nagpur News in Marathi)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची गेल्या अडीच वर्षातील वाटचाल बघितली तर मुख्यमंत्री (Chief Minister) असूनसुद्धा शिवसेनेचीच (Shivsena) अधिक पीछेहाट झाल्याचे बघायला मिळते. त्यामुळेच त्यांचे तब्बल ३९ आमदार बंडखोर झाले. उद्या महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन पडले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेसला त्याचे फार नुकसान होणार नाही. भाजपला (BJP) तर मुळीच नाही. नुकसान झालेच तर ते शिवसेनेचे होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला संपविण्यासाठी तर महाविकास आघाडी तयार झाली नव्हती ना, असा सवाल उपस्थित होतो आहे.(Maharashtra Political Crisis)

खासदार कुंपणावर..

विदर्भातील सर्वसामान्य शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असले, तरी ताज्या अभूतपूर्व फुटीमुळे येथील शिवसेनेची ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत. सद्यःस्थितीत केवळ एक आमदार वगळता शिवसेनेचे पाचपैकी चार आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तिन्ही खासदारांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसली, तरी ते कुंपणावरच असल्याचे चित्र आहे. परिणामी भविष्यात विदर्भात शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या संख्येला ओहोटी लागेल, हे निश्चित. या स्थितीचा भाजपसोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भ पूर्वी काँग्रेसचा गड होता. गेल्या दोन दशकांपासून विदर्भावर भाजपचे वर्चस्व आहे.

बुलडाण्यात सर्वाधिक प्रभाव..

सध्या विदर्भात शिवसेनेचा सर्वाधिक प्रभाव असलेला जिल्हा म्हणजे बुलडाणा. येथून दोन आमदार आणि एक खासदार शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. बुलडाण्यात शिवसेनेवर खासदार प्रतापराव जाधव यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या प्राधान्यामुळेच मेहेकर (राखीव) मतदारसंघातून डॉ. संजय रायमूलकर सातत्याने विजयी होत आहेत. तर, यंदा बुलडाणा मतदारसंघातून त्यांनी संजय गायकवाड यांना उमेदवारी देत विजयी केले. हे दोन्ही आमदार त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. आज हे दोन्ही आमदार शिंदे गटाला मिळालेले आहेत. खासदार प्रतापराव जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे सांगताहेत. भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका न घेतली तर नवलच.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
Eknath Shinde: ठरलं तर...! बहुमत चाचणीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत येणार

यवतमाळमध्ये बंजारा कार्ड महत्त्वाचे..

यवतमाळ-वाशीम या जिल्ह्यांत बंजारा कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे. बंजारांच्या बळावरच उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो. बंजारा समाजातील एक प्रभावी नेते व माजी मंत्री संजय राठोड यांनी शिंदे गटाला जवळ केल्याने या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना कमजोर होईल. याशिवाय शिवसेनेच्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी या अडचणीत असताना पक्षाने त्यांना मदत केली नव्हती, अशी त्यांची ‘भावना’ आहे. ईडीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्यानंतर त्यांनी वेळ दिला नव्हता, ही सल त्यांना लागून गेली होती.

अकोल्यात भाजपचे वर्चस्व..

एकेकाळी अकोला जिल्हात शिवसेनेचा बोलबाला होता. आज बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनासुद्धा भाजपची सक्रिय साथ लाभल्याने ते विजयी झाले होते. ते अद्याप तरी उद्धव ठाकरेंकडे आहेत. त्यासाठी ते गुवाहाटीहून परत आले आहेत.

अमरावतीत प्रभाव ओसरला..

काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातून खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ हे दोघेही बाप-लेक खासदार-आमदार होते. हा मतदारसंघ राखीव झाला आणि तेथे स्थानिक नेतृत्वाचा विकास न झाल्याने येथे शिवसेना हवा तसा प्रभाव दाखवू शकणार नाही. त्यातल्या त्यात नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानेही माहोल तयार केला आहे. त्यामुळे येथेही शिवसेनेला काही भविष्य आहे, असे वाटत नाही.

पूर्व विदर्भात जान नाही..

पूर्व विदर्भात भाजपने जातीय समीकरणांचे गणित साधत मोठा जनाधार निर्माण केला आहे. येथे शिवसेना केवळ नावालाच आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने हे सध्या उद्धव ठाकरे गटाकडे असले तरी योग्यवेळी ते निर्णय घेऊ शकतात. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. मात्र, त्यांनी शिवसेना वाढीसाठी काहीही केले नाही.

कार्यकर्ते उद्धव यांच्या पाठीशी..

विदर्भात सर्वत्र भाजपने शिवसेनेला नेहमीच दाबून ठेवले आहे. त्यामुळे आज शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. विदर्भातून शिवसेनेच्या चार व सहा अपक्षांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा दिला असला, तरी एकाही प्रमुख पदाधिकाऱ्याने शिवसेनेला रामराम केलेला नाही. शिंदे यांचा संपर्क केवळ आमदारांशी आहे. शिंदे यांना सर्वसामान्य ओळखत नाहीत, अशी स्थिती सांगितली जात असली तरीही. पूर्व विदर्भातील एक मोठा गट शिंदेंचा समर्थक आहे.

सद्यःस्थिती..

- विधानसभेतील २८८ पैकी ६२ म्हणजेच सुमारे २२ टक्के आमदार विदर्भातून येतात.

- पूर्व विदर्भात रामटेक वगळता नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत शिवसेनेची मोठी ताकद कधीच नव्हती.

- पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांनी शिवसेनेला नेहमीच भरघोस पाठबळ दिले.

- शिवसेनेच्या चिन्हावर चार आमदार व दोन खासदार पश्चिम विदर्भातूनच येतात. यातील संजय राठोड, संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड या तीन आमदारांनी बंड केले आहे. चारपैकी एकमेव नितीन देशमुख उद्धव ठाकरेंसोबत आहेत, जे की गुवाहाटीवरून परत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com