Chandrapur District Superintendent of Police News : सायकलने जात असताना एसपी साहेबांना आठवीतला एक मुलगा अचानक रस्त्यावर भेटला. साहेबांनी सहजच त्याची विचारपूस केली अन् मग काय त्यांच्यात बराच वेळ संवाद झाला. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला यूपीएससीच्या नियोजनासोबत अभ्यासाबाबतची असलेली इत्थंभूत माहिती आहे, हे बघून एसपी साहेबही थक्कच राहिले. (He was tempted to get out of the car and ride a bicycle)
एका महत्त्वाच्या कामाकरिता चंद्रपूरचे (Chandrapur) एसपी रवींद्रसिंह परदेसी हे पोंभुर्णा तालुक्यातील डांगेरहळदी येथे गेले होते. गावातील वातावरण बघून गाडीतून उतरून त्यांना सायकल चालविण्याचा मोह झाला. सायकलिंग करत असताना मार्गावर त्यांना एक मुलगा भेटला. तोही सायकलवरच होता. एसपी साहेब सहजपणे त्याच्याशी बोलले.
त्याचं नाव विचारलं. सोहम उईके हे आपले नाव असून, मी आठवीत शिकतो, असे त्याने सांगितले. मग काय साहेब एक एक प्रश्न विचारत गेले अन् तो धाडधाड उत्तरं देत गेला. यूपीएससीच्या परीक्षेच्या (UPSC Exam) नियोजनाची इत्थंभूत माहिती सोहमने एसपींना दिली. अभ्यासाशिवाय आमचं काही खरं नाही. अभ्यास केला नाही तर जीवनाला जंग लागतो व तो मला लागू द्यायचा नाही, असे आत्मविश्वासाचे बोल सोहम बोलला.
आठ तास अभ्यास करायचा, एक तास मित्रासोबत खेळायचं अन् आठ तास मस्त झोप घ्यायची. आठवड्यातून एक चांगला चित्रपट जरूर बघावा, ही चर्तुसूत्री वापरली तर आयएएस (IAS) होण्यापासून आपणाला कुणीही रोखू शकत नाही. एका आठवीतल्या बालकाची हुशारी बघून साहेबांनी त्याच्याशी चर्चा लांबविली. या वेळी त्यांनी आपुलकीने सोहमच्या संपूर्ण कुटुंबीयांची माहिती घेतली.
तुझे बाबा काय करतात? आई काय करते, असे अनेक प्रश्न रवींद्रसिंह परदेसी यांनी विचारले. तुला हे एवढं सारं ज्ञान कुणी दिलं, या प्रश्नावर यावर आपले मामा देवीदास मेश्राम हे आपले मार्गदर्शक असल्याचे सोहमने सांगितले. आमच्या दोन पिढ्यांत नोकरी आम्ही बघितली नाही. आता मला आयएएस होऊन ही परंपरा मोडीत काढायची असल्याचे सोहमने सांगितले.
एका ग्रामीण भागातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, जीवनाकडे त्याचा बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, यूपीएससीच्या नियोजनाची इत्थंभूत माहिती, अभ्यासाबाबतचे त्याचे मत बघून चंद्रपूरचे एसपी रवींद्रसिंह परदेशी थक्कच राहिले. त्यांनी सोहमला कुठलीही अडचण आल्यास थेट मला फोन करायचा व हक्काने सांगायचं, असा विश्वास दिला.
संवेदनशील अधिकारी असला की, तो थेट सामान्यात मिसळतो. त्यांच्या वेदना, प्रश्न जाणून घेतो. असेच अधिकारी समाजात सकारात्मकता निर्माण करतात. अचानकपणे झालेल्या भेटीने एका विद्यार्थ्याच्या हुशारीची जाणीव एसपी रवींद्रसिंह परदेशी यांना झाली. सोहमसोबतचा त्यांचा संवाद समाजमाध्यमांत बराच चर्चिला जात आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.