Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray News : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा काल (ता. १३) नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रामटेकमध्ये पोहोचली. तेथे उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी रामटेकचा गड आम्हीच सर करणार असल्याचे सुतोवाच केले. (Police were shooting videos of everyone's speech in the meeting)
सभेच्या सुरूवातीलाच त्यांनी पोलिसांवर टोलेबाजी केली. दोन पोलिस कर्मचारी सभेत सर्वांच्याच भाषणाचे व्हिडिओ शूट करत होते. तेव्हा मंचावरील सर्व पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन झाल्यावर ‘ही सभा सुरक्षित पार पाडण्यासाठी आले असलेले किंवा त्यापेक्षाही जास्त या सभेत कोणता वक्ता चुकतो आणि आपण पटकन जयस्वालांना (आमदार आशिष जयस्वाल) कळवतो आणि कोणतं कलम टाकायचं, यासाठी तत्पर राहतो, अशा तयारीने थांबलेले आमचो पोलिस भाऊ’, असं पोलिसांना उद्देशून म्हणाल्या. ‘असंच कॅमेरा घेऊन थांबायचं, हलायचं नाही…, लागेल तर त्यांना स्टॅंड-बिंड द्या रे बाबा’, असा पुन्हा एक टोला त्यांनी हाणला.
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, राजू हरणे, संपर्कप्रमुख बाळा राऊत, माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेश साखरे, महिला संघटक शिल्पा बोडखे, विशाल बरबटे उपस्थित होते. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमीक्रीदेखील केली. महागाईवरून त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारावर चांगलाच हल्लाबोल केला. २०१४ आणि २०२२ या वर्षांतील जिवनावश्यक वस्तुंच्या दरात किती तफावत आली, महागाई किती पटीने वाढली, हे त्यांनी जनतेला पटवून सांगत, सरकारवर ताशेरे ओढले. शिंदे गटात गेलेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर तर त्या तुटूनच पडल्या.
खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार जयस्वाल यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि त्याचा जनजिवनावर व पिकांवर प्रभाव पडून काय नुकसान झाले. हे त्यांनी विविध व्हिडिओंवरून दाखवले. आमदार जयस्वालांना एक रामटेक सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही आणि येथेही ओळखले जाते, ते केवळ पैसे खाणारा आमदार म्हणूनच, असे म्हणत त्यांनी आमदार जयस्वालांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.
२०२४मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक जयस्वालांना (Ashish Jaiswal) चांगलाच धडा शिकवणार आहेत. तसेही गद्दारांना हुसकावून लावण्याची रामटेकची (Ramtek) परंपरा आहे. त्यामुळे जनता त्यांना आता स्वीकारणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशाल बरबटे यांना रामटेकमधून लढण्याचे आदेश दिलेले आहेत. तेच आता रामटेकचा गढ सर करतील आणि गद्दार आशिष जयस्वालांना धडा शिकवतील, असे म्हणत २०२४च्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना (Shivsena) दिल्या. एकंदरीतच ठाकरे गटाने रामटेकचा गड सर करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.