नागपूर : शिक्षक आमदार नागो गाणार यांचा कार्यकाळ संपत आला आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये अर्धा डझन इच्छुक तयार झाले आहे. नागो गाणार यांना यावेळी बदलावे अशी मागणी पुढे येत आहे. पण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला यावेळीही गाणारच हवे आहेत. याबाबत निर्णय नितीन गडकरी, (Nitin Gadkari) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रशेखर बावनकुळे घेणार असल्याची माहिती आहे.
भाजपमध्ये अर्धा डझन उमेदवार शिक्षक आमदार होण्यासाठी इच्छुक असले तरी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आम्हाला नागोराव गाणार हेच आमदार म्हणून हवे, असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे दिला आहे. दुसरीकडे नागपूर विद्यापीठाच्या शिक्षण मंचतर्फे तसेच शिक्षक आघाडीने माजी महापौर कल्पना पांडे यांचे नाव पाठविले आहे.
आमदार नागोराव गाणार यांच्या कार्यकाळ संपत आला आहे. ते दोनदा नागपूर विभागातून निवडून आले आहेत. निवडणूक आयोगामार्फत शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची तयार करण्यात आली आहे. सध्या शिक्षक मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यात शिक्षक आमदारांची निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपच्यावतीने यंदा गाणार यांना बदलावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यांच्याऐवजी शिक्षकांमधून नवा उमेदवार देण्याची मागणी केली जात आहे. असे असले तरी आमदार होण्यास इच्छुक असलेले उमेदवार वगळता गाणार यांच्या नावाला कोणाचा विरोध नाही. सुमारे बारा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांशिवाय दुसरा मुद्दा उपस्थित केला नाही. सत्ता कोणाचीही असली तरी ते शिक्षकांच्या मागण्या रास्त असेल तर कुठलीही भीडमुर्वत न बाळगता बोलतात. स्वपक्षासोबतही थेट भांडतात. कुठल्याही राजकारणात ते अडकत नाही.
कायम हेडमास्तरच्या भूमिकेत असतात. बदल्या आणि अनुदानाच्या भानगडीपासून त्यांनी स्वतःला लांबच ठेवले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. भाजपने त्यांच्या या जमेच्या बाजूंचा विचार करून पुन्हा उमेदवारी दिली तर इच्छुकांचा चांगलाच हिरमोड होऊ शकतो. मात्र त्यांना भाजपने उमेदवारी दिली तर सोले सरांचे काम वाढू शकते. स्वभावाने अवलिया असल्याने गाणार यांना राजकारणातील छक्केपंजे समजत नाही. उमेदवारी अर्जापासून तर सर्व थकबाकी भरण्याचे कामे अनिल सोले यांना करावे लागेल. सोबत प्रचाराला घेऊनही फिरावे लागेल.
संघटनांनी पाठवलेले प्रस्ताव अंतिम नसतात. मात्र त्यास निश्चितच महत्त्व असते. शेवटी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत घ्यावेच लागणार आहे. या निवडणुकीत शिक्षक मतदार असल्याने सक्रिय शिक्षकांमधून उमेदवार देणे आवश्यक आहे. शैक्षणिक पेशापासून लांब असलेल्या उमेदवार लादल्यास भाजपचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.