
Hingoli News : शिवसेनेतील बंडखोरीपासून ते आजपर्यंत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आक्रमक स्वभावामुळे कायमच चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना मारहाण, कधी शिवीगाळ अशा या ना त्या कारणानं बांगर विरोधकाच्याही निशाण्यावर असतात. पण आता हेच बांगर वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. आणि विशेष म्हणजे ते त्यांच्याच विधानामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ(Ayodhya Paul) यांनी बांगराच्या बंडखोरीनंतर आक्रमक पावित्रा घेतला आहे. पौळ यांनी तेव्हापासून बांगरांवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यांनी आता पुन्हा बांगरांना अडचणीत आणणाऱ्या त्यांच्याच आव्हानाची आठवण करुन देत खोचक सवाल केला आहे.
बांगर यांचं आव्हान काय होतं?
बाजार समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष बांगर यांनी कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही असं आव्हानच बांगर यांनी दिलं होतं.
पण जाहीर झालेल्या कळमनुरी बाजार समितीच्या निकालात १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणण्यात संतोष बांगर(Santosh Bangar) यांना यश आलं आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी व्हिडीओद्वारे बांगरांना लक्ष केलं आहे.
कधी काढतोयस मिशी?
अय़ोध्या पौळ यांनी संतोष बांगरांना चांगलाच टोला लगावला आहे. पौळ म्हणाल्या,दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही.
दोन दिवसांपूर्वी तो माझ्यासमोर म्हणाला की १७ पैकी १७ जागांचं पॅनल निवडून नाही आणलं, तर मी माझी मिशी काढतो. संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ असं अयोध्या पौळ म्हणाल्या आहेत.
अयोध्या पौळ म्हणाल्या, ज्या ठाकरेंनी, शिवसेनेनं तुला नाव, पद, पैसा, प्रतिष्ठा असं सगळं काही दिलं, त्याच शिवसेने(Shivsena)ला त्याच शिवसैनिकांसमोर जर तू चॅलेंज करतोस तर तू स्वत:च्या हातांनी तुझं राजकीय करिअर खराब करून घेतलं आहेस. स्वत:च स्वत:च्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहेस असंही अयोध्या पौळ व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.