अश्रूंची झाली फुले..! महिलांच्या न्यायहक्कासाठी एका झंझावाती पर्वाचा आरंभ..

भारतीय संस्कृतीत घेण्यापेक्षा देण्याला अधिक महत्त्व दिले जाते, विकसित व्हावे अर्पित होऊन जावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय रुपालीताई चाकणकर… (Rupali Chakankar)
Rupali Chakankar NCP

Rupali Chakankar NCP

Sarkarnama

श्रीकांत शिवणकर (महाराष्ट्र संघटक सचिव, राष्ट्रवादी कॉंग्रेस)

नागपूर : पीडित महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी, सुनावणीसाठी मुंबई कार्यालयात येणे शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा व्हावा, याकरिता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी राबविण्यात येत आहे. या संकल्पनेतून आयोगाकडे दाखल झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तक्रारींची व नव्याने आलेल्या तक्रारींवर सुनावणी आयोजित करण्यात आली होती. ताईंनी राज्य महिला आयोगाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिलांच्या न्यायहक्कासाठी एका झंझावाती पर्वाचा आरंभ झाला आणि विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल होणे सुरू झाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) जिल्ह्याचा निरीक्षक या नात्याने मला ताईंसोबत प्रवासादरम्यान राहण्याचा योग आला आणि पक्षासाठी कर्तव्यनिष्ठ, उत्तम प्रशासक पण त्या पलीकडे माणुसकी जपणारे, एक उमदं व्यक्तिमत्त्व दडलं आहे, याची अनुभूती मला आली. स्त्रियांच्या समस्यांबद्दल त्यांना वाटत असलेली तळमळ ही केवळ भावनेपुरती मर्यादित नव्हती, तर त्यांच्यासाठी समर्पित कार्य करण्याची इच्छा ताईंच्या प्रत्येक शब्दात दिसत होती. जनसुनावणीकरीता आलेल्या कित्येक समस्याग्रस्त स्त्रिया व मुलींना त्यांनी मानसिक आधार दिला. भारतीय संस्कृतीत घेण्यापेक्षा देण्याला अधिक महत्त्व दिले जाते, विकसित व्हावे अर्पित होऊन जावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय रुपालीताई चाकणकर…

वर्ष २०१९, शरद पवार साहेबांनी ज्यांना मान, पद, प्रतिष्ठा दिली, असे अनेक लोक पक्षाला सोडून जात होते. त्यातच राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिला. आदरणीय सुप्रियाताईंना आदर्श मानणाऱ्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनात २००८ पासून खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पुणे शहराध्यक्ष या जबाबदारीच्या पदांचा अनुभव असलेल्या रुपालीताईनां २७ जुलै २०१९ ला पक्षातर्फे महिला प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. ऑक्टोबर २०१९, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार पक्ष सोडून गेले. अशावेळी पवार साहेबांसोबत ताईंनी सोलापूर ते सातारा येथे झालेल्या कार्यकर्ता सुस्वराज्य संवाद यात्रेत महत्वाची धुरा सांभाळून पक्षाच्या महिला संघटनेस बळकटी दिली. सातारा येथे भर पावसात राज्यभरातल्या तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवून जेव्हा साहेब उभे झाले, तेव्हा नभातूनसुद्धा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अभिषेक पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आसुसला होता, परिवर्तनाची चाहूल राज्यात लागली होती. त्यावेळी ताईंसारखे निष्ठावान पदाधिकारी पवार साहेबांसोबत काटेरी मार्गाने अहोरात्र कार्य करत, येणाऱ्या सुवर्णकाळाची गुंफण करत होते.

<div class="paragraphs"><p>Rupali Chakankar NCP</p></div>
रुपाली चाकणकर म्हणाल्या, ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली ते आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत...

ताईंसोबत पहिल्यांदाच भेट झाली ती विमानतळावर जेव्हा महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे नागपूरला येणे झाले. शहराचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष या नात्याने मला त्यांना विमानतळ आगमनापासून राहत्या ठिकाणी नेण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर महिला मेळावा, शिवस्वराज्य यात्रा, अशा अनेक वेळी नागपूरला आल्यानंतर ताईंची भेट झाली आणि त्यांचे पक्षासाठी कार्य आणि योगदान जवळून बघण्यास मिळाले. आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून विदर्भातून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली. या पुढाकाराने पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून पक्षबळकटीसाठी प्रयत्न होत होते. परिवार संवाद यात्रेदरम्यान ताईंचे कार्य अधिकाधिक सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात अधोरेखित होत गेले आणि त्यामुळे पक्षसंघटनेसाठी उत्तम कार्य करण्याची जाणीव दिवसेंदिवस वाढत गेली. धाडस हे क्षमतेनुसार जरी येत असलं तरी ते धाडस करण्यासाठीची चालना, प्रेरणा देणारा मार्गदर्शक किंवा गुरू असल्याशिवाय कुणावरच किमया होत नाही. क्षमतांची ओळख, त्या क्षमतांनुसार संधी उपलब्ध करून देण्याचं पालकत्व जपणाऱ्या श्रद्धेय पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी रुपालीताईंना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यावेळेस राजकारण म्हणजे विशेष करणे, ही व्याख्या समजून, राजकारणात सहभाग घेऊन, जनतेच्या जीवनातील समस्या सोडवण्याचे कार्य करावे, हीच श्रद्धेय साहेबांची शिकवण उरी बाळगून ताईंनी कार्याला सुरुवात केली. एप्रिल २०२१ ला गडचिरोली जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची मला जबाबदारी मिळाल्यानंतर ताईंसोबत बरेचदा जिल्ह्यातील महिला संघटनेबद्दल चर्चा झाली आणि ते कार्य करण्यासाठी त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. मुंबई पक्ष कार्यालयात त्यांची भेट होत असते, ‘श्रीकांतजी तुमचे जिल्ह्याचे कार्य चांगले सुरू आहे, अधिक चांगले करा’ अशी शाबासकीची थाप देऊन चांगले कार्य करण्यासाठी त्यांचे प्रोत्साहन मला मिळत होते. ताईंनी ऑक्टोबरमध्ये राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून महिला आयोगाचे कार्य गतिमान पद्धतीने सुरू झाले. महिलांच्या तक्रारीनंतर त्यांना न्याय देण्यासाठी आयोगाने तात्काळ पावलं उचलण्यास सुरुवात केली. थेट पीडित महिलांच्या गावांत-जिल्ह्यांत जाऊन स्वत: ताईंच्या उपस्थितीत सुनावणी करण्याचे ठरविले आणि यासाठी त्या गडचिरोली येथे ९ आणि १० तारखेला येणार अशा सूचना प्राप्त झाल्या.

ताईंचे, सकाळी ८.५५ ला नागपूर विमानतळावर आगमन झाले, प्रोटोकॉलप्रमाणे विमानतळावर व्यवस्था करण्यात आली होती. नागपुरातील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आगमनानंतर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी करत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील जनसुनावणी १२.०० वा असल्यामुळे जाण्यासाठी घाई करणे गरजेचे होते, तरी ताई प्रत्येकाला वेळ देऊन त्यांच्याबद्दल विचारपूस करत होत्या. सर्वांच्या भेटी घेतल्यानंतर ताई गाडीमध्ये बसल्या, सोबत मी, आयोगाचे अधिकारी आणि पोलीस असा प्रवास सुरू झाला. नागपूरला विमानाने येताना ताईंना भल्या पहाटे निघावे लागणार, याची कल्पना मला असल्यामुळे त्यांच्यासाठी काही खाण्यास असावे म्हणून पोहे डब्यात घेऊन आलो होतो. नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने काही अंतर गेल्यानंतर ताईना सहज नाश्‍ता कराल काय, हे विचारले असता त्यांनी आपण सर्वच मिळून करू म्हणत त्यांनी होकार दिला. त्यांना डब्यातून पोहे देताना आणि त्यांच्यासोबत गाडीमध्ये प्रवास करताना एक वेगळेच समाधान सर्वांना मिळत होते. इतक्या मोठ्या पदावर विराजमान असताना त्यांची नाळ जमिनीशी जुळली आहे, याची प्रचिती प्रत्येकाला आली होती. प्रवासादरम्यान ताई आपल्या पुण्यातील आणि मुंबईतील कार्यालयात कामाच्या सूचना देत होत्या तसेच महिलांच्या तक्रारींचा निवाडा, महिला पक्षसंघटना यावरच त्यांचा वार्तालाप होत होता.

चंद्रपूर येथे पोहोचल्यानंतर विश्रामगृहात वाट बघणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना भेटून, ताईंनी बरोबर दुपारी १२ वा जिल्हा नियोजन सभागृहात जनसुनावणीला सुरुवात केली. कामाला प्राधान्य आणि वेळेचे अचूक नियोजन त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसून येत होते. तक्रारकर्त्या महिला, मुली यादरम्यान आपल्या भावना ताईंजवळ व्यक्त करत होत्या आणि ताई त्यांच्या दुःखात समरस होत आई, मोठी बहीण यांच्या रूपात त्यांना धीर देत होत्या. जनसुनावणीच्या दरम्यान ताईंनी सर्वांना संबोधन करताना कुठल्याही परिस्थितीत महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही आणि ते थांबविण्यासाठी महिला आयोग कठोर पावले उचलण्यास कटिबद्ध आहे, असे अभिवचन देऊन धीर दिला. दुपारचे ४ वाजल्यानंतरही भूक, तहान याची कुठलीही तमा न बाळगता, ताई आलेल्या प्रत्येक महिलेची तक्रार, त्यावर झालेली कारवाई, त्यावर निवाड्यासाठी सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महिला आयोगाचे कर्मचारी यांच्याशी करत होत्या. जनसुनावणीनंतर पत्रकारपरिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बीट मार्शल यांची माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर जिल्यातील पक्षसंघटना बळकटीच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर ग्रामीण आणि शहरातील महिलांच्या वेगवेगळ्या मेळाव्यात ताईंनी चर्चा करून संबोधन केले. संध्याकाळचे ७ वाजून गेल्यानंतरही काही न खाता पक्षासाठी अविरत कार्य करणारी ताई आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांसाठी दिशादर्शक होती. या प्रवासादरम्यान ताईंच्या ऑनलाइन बैठकी, कॉन्फरंस आणि रात्री ११ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी कुठलाही शीण न दर्शवता चर्चा, एक क्षणही वाया न घालवता पक्षासाठी कार्य हे सर्व काही माझ्या क्षमतेच्या, विचारांच्या पलीकडले वाटत होते.

दुसरा दिवस, गडचिरोली दौरा :

गडचिरोलीला जाण्यासाठी सकाळीच तयार होऊन निघणे आवश्यक होते, ताईंना रात्री उशीर झाला होता आणि त्याही थोड्या उशिरा निघतील, या विचाराने स्वतःशीच लढत मी कसाबसा ८ वाजता हॉटेल रिसेप्शन मध्ये गेलो असता ताई आधीच इतर पदाधिकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसल्या. ‘कधी निघायचं?’, ताईंनी विचारलं? मी भानावर यायच्या आत ताईंनी परत विचारले, निघायचं न श्रीकांतजी! इथे ताईंच्या शैलीबद्दल थोडेसे सांगावेसे वाटते. जे आधीच्या दिवशी अनुभवायला मिळालं. आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची त्यांची पराकाष्ठा सर्वप्रथम त्यांच्या हाताच्या रूपाने आपल्या जवळपास पोहोचते. इथे त्यांच्या हातवाऱ्यांचा वेग त्यांच्या आवाजाच्या वेगाशी स्पर्धा करतो. आपला मुद्दा समोरच्याला समजला नसेल, तर त्याची गैरसोय नको, म्हणून त्याला न विचारता तोच मुद्दा पुन्हा एकदा दुसऱ्या शब्दात सांगण्याचा चांगुलपणा त्यांच्यामध्ये बघितला. मी काही बोलणार त्याच्या आतच ताईंनी सर्वांचा निरोप घेत गाडीकडे वळल्या आणि आम्ही सर्व गडचिरोलीकडे निघालो. प्रवासादरम्यान ताईंना गडचिरोली जिल्ह्यात नदीकाठी शिंगाड्याची शेती होत असल्याचे सांगितले आणि त्यासाठी लागवड करणाऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात, असे सांगितले. उत्सुकतेने ताईंनी रस्त्यावरील शिंगाडे आणि त्याची शेती पाहण्याकरिता गाडी थांबवण्यास सांगून, शिंगाडे विकणारी महिला आणि तिच्या मुलांशी सामान्य गृहिणीसारख्या बसून मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. इतक्या मोठ्या पदावर असतानादेखील त्यांचा साधेपणा, आपुलकी आणि जमिनीशी नाते अचंबित करणारे होते.

गडचिरोलीत पोहोचल्यानंतर पक्षातील मान्यवरांशी, पदाधिकाऱ्यांची चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गडचिरोली येथे तक्रारकर्त्या भगिनी, महिलांच्या स्वयंसेवी संस्था यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन हॉल भरगच्च होता. प्रत्येकाशी ताईनी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली आणि न्यायनिवाडा दिला. यादरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, गडचिरोली महिला आयोगाचे अधिकारी यांच्याशी बोलून सूचना केल्या. महिला पोलीस अधिकारी मोहिमेवर असताना प्रसूती रजा संपल्यानंतर लहानग्या बाळासोबत मोहिमेवर लढा देतात. या परिस्थितीत दर तीन तासांनी इतर अधिकारी त्यांच्या जागी मोर्चा सांभाळतात आणि त्या मिळालेल्या वेळेतच इवल्याशा बाळाला दूध पाजून परत आपल्या जागेवर लढण्यासाठी सज्ज होतात, हे कथन ऐकताना त्यांच्या अश्रूत स्वतःचे डोळे ओल्या करणाऱ्या रुपालीताई आज अनुभवायला मिळाल्या होत्या. पोलीस विभागातील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अडचणींना मात देऊन त्यांनी केलेल्या कार्याचे ताईंनी कौतुक केले. हे सर्व होत असताना दुपारचे ४ वाजले होते. या दरम्यान गडचिरोली येथे आदिवासी मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ॲकेडमीने ताईंना विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे मार्गदर्शनास्तव येण्यास विनंती केली. वेळेअभावी त्यांना पुढच्या वेळी नक्की येऊ असे सांगून, ताईंनी दिलगिरी व्यक्त केली. महिला मेळाव्याठिकाणी ताईंचे आदिवासी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मेळाव्यात ताईंनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात आवाहन केले. ते करत असताना पवार साहेबांनी महिलांसाठी काय केले आणि त्यांना आपण काय देऊ, याचा विचार करावा, या माध्यमातून प्रोत्साहित केले. संध्याकाळी ७ वाजता मेळावा संपल्यानंतर नागपूरला परत जाण्यापूर्वी अकॅडमी विद्यार्थ्यांना भेटण्याची ताईंनी इच्छा जाहीर केली.

स्वप्नझेप अकॅडमी, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींकरिता कार्यरत आहे, त्यांचा दुपारपासून होणाऱ्या आग्रहाने ताईंनी रात्री ७.३० वा विद्यार्थांना भेट दिली, अडचणी जाणून घेतल्या. संघर्ष जीवनातील गुरुकिल्ली आहे आणि त्यातूनच व्यक्तिमत्वाचा विकास घडतो, हे ताईंनी त्यांना पटवून दिले. नागपूरला निघण्यासाठी रात्रीचे ८ वाजले होते आणि पोहोचण्यास ११ वाजतील, हे नक्की असताना गडचिरोली ते नागपूर मार्गावरील पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव भिवापूर, उमरेड, कुही येथे सदिच्छा भेट देऊन ताईंनी सर्वांचे समाधान केले. नागपूरला पोहोचायला रात्रीचे १२.३० वाजले होते आणि ताईंना पहाटे मुंबईला निघायचे होते. या प्रवासादरम्यान ताई पूर्ण वेळ १२ तारखेला होणाऱ्या आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यात व्यस्त होत्या. ताईंसोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एकेक पैलू समोर येत गेले आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात, वाक्यात शिकण्यासारखे अनेक गुण आत्मसात करण्याची संधी मला मिळत होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू पाहताना मनात नेहमी एक विचार येई, ‘एखादी व्यक्ती एकाच वेळी इतके सर्व कसे करू शकते? लोक ज्यालाच ‘चालतंबोलतं ज्ञान पीठ’ म्हणतात ते हेच तर नव्हे ना??”

संपूर्ण दौऱ्यात ताईंची संवेदनशीलता, तळागाळातील लोकांच्या समस्या दूर करण्याची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसत होती. महिलांना होणारा त्रास, त्यांच्या वेदना स्वतः अनुभव करून त्यांना न्यायनिवाडा देताना एका माउलीचे दर्शन झाले. खऱ्या अर्थाने तक्रार करणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींचे “ताईंनी अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले” समाजाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी भरभरून दिले आहे, आपण त्यांच्यासाठी चांगले कार्य करून परतफेडीसाठी खारीचा वाट उचलला, तरी जीवन सार्थक होईल, हे त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रकर्षाने जाणवत होते.

ताईंच्या प्रत्येक कृतीत या ओळींची आठवण झाली .....

जाणवाया दुर्बलांचे, दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा, रंध्रातुनी संवेदना

धमन्यांतल्या रुधिरासया, खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस, आणि अर्थ या जगण्यास दे...

पक्षासाठी, स्त्री हक्कांसाठी, अविरत कार्य करणाऱ्या या माउलीला शतशः नमन !!!!

- श्रीकांत शिवणकर

बी .ई. (यांत्रिकी ), मास्टर ऑफ व्हाल्यूएशन,

राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रदेश निरीक्षक, जिल्हा : गडचिरोली

ncpshrishivankar@gmail.com

९६७३२३३३९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com