नागपूर, पुण्यात जो धक्का बसला तो टाळण्यासाठी भाजपची आतापासूनच पावले..

नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बांधलेला मतदारसंघ होता.
BJP, Nagpur, Pune
BJP, Nagpur, PuneSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) आणि पुणे (Pune) विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांनी दणकून आपटणी खाल्ली होती. या पराभवाची सल भाजप नेत्यांच्या मनांवर खोलवर परिणाम करून गेली. यापुढे अशी अपमानजनक हार बघावी लागू नये, म्हणून भाजप नेत्यांनी आत्तापासूनच सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या अमरावती (Amravati) पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने चैनसुख संचेती यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. याच निवडणुकीसाठी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बांधलेला मतदारसंघ होता. त्यामुळे तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्या रूपाने झालेला पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. विजयाचा पूर्ण आत्मविश्‍वास भाजपला असतानाही जोर का झटका लागल्याने त्या धक्क्यातून भाजप नेते बरेच दिवस सावरले नव्हते, हे वास्तव आहे. संदीप जोशी यांचा हकनाक बळी गेला, असेही त्यावेळी बोलले जात होते. पण पुढील वर्षी अमरावतीमध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघामध्येही महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का देत संग्राम देशमुख यांचा पराभव केला आणि अरुण लाड यांना निवडून आणले. उल्लेखनीय म्हणजे लाड यांनी पहिल्या फेरीतच १ लाख २२ हजार ४५ मते घेऊन विजय मिळविला. भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार ३२१ मते मिळाली. नागपूरप्रमाणे हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. नागपुरात दीड ते दोन वर्षांपूर्वीच अभिजित वंजारींची निवडणूक सुरू झाली होती. या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी मोठा इतिहास रचला. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे सर्व संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही रात्र जागून अंतिम निकालाची वाट बघत होते.

BJP, Nagpur, Pune
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव कुणामुळे?

आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नव्हता. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान होते. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिलेला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले होते. याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्षांआधीपासून या मतदारसंघात मशागत केली होती आणि बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाला आणि यामध्ये भाजपचा गढ ढासळला. आता पुढील वर्षी अमरावतीमध्ये काय होणार, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com