BSP Politics News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 'संविधान बचावाचा' मुद्दा तापवला. भाजपसोबतच बहुजन समाज पक्षाला याचा मोठा फटका बसला होता. कॅडर व्होट आणि हक्काची मते पक्षाच्या उमेदवारांना मिळाली नव्हती.
हे बघून बसपने आता विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरवादी आणि बहुजन विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
बसपने आजवर सर्व निवडणुका स्वबळावर लढल्यात. महाराष्ट्रात काँग्रेस आणि भाजपपासून (BJP) कायम अंतर राखून ठेवले होते. 'भाजप नागनाथ, तर काँग्रेस सापनाथ', असा आरोप बसपतर्फे सातत्याने केला जातो. महाविकास आघाडी आणि महायुतीमुळे आता निभाव लागणे अशक्य असल्याची जाणीव बसपला झाली. काळाची पावले ओळखून विधानसभेसाठी आता समविचारी पक्ष आणि संघटनांसोबत हातमिळवणीची तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha) निकाल बघून बसपने महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणीची बरखास्त केली होती. राज्यात मिळालेली अत्यल्प मते आणि गटबाजीमुळे निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मारहाण, गटबाजीचे प्रकरण बरेच गाजले. निवडणुकीनंतर मतमोजणीपूर्वी दोन माजी पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर गटबाजी चव्हाट्यावर आली होती. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पक्षाध्यक्ष मायावती यांच्या दरबारात गेले. दोन्ही गटांची भूमिका जाणून घेतल्यावर त्यांनी 24 जूनला ॲड. परमेश्वर गोणारे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार करून कार्यकारिणी बरखास्त केली होती.
अलीकडेच बसपने ॲड. सुनील डोंगरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्यकारिणीच घोषणा अद्याप व्हायची आहे. उद्या बुधवारी (ता.10) बसपचे प्रदेश प्रभारी खासदार रामजी गौतम आणि प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत राज्य समितीची पहिली बैठक मुंबईत होणार आहे. यात कार्यकारिणीची घोषणा करून कामाचे वाटप, विभाग आणि जबाबदारी सोपवण्यात येईल.
यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा करण्यात येणार आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष राज्यघटनेविरोधात आहेत. संविधान बदलणार असल्याच्या प्रचाराने जनतेची दिशाभूल झाली. येणाऱ्या काळात जनतेच्या दरबारात वस्तुस्थिती मांडण्यात येईल. यादरम्यान बैठका, मेळावे, सभा, यात्रांच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार आहे, असे सुनील डोंगरे यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.